महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या विकासाचे द्योतक - डॉ. सोनाली सरनोबत
शिनोळीत महिला सक्षमीकरणासाठी हळदी-कुंकू समारंभ व प्रबोधन कार्यक्रम संपन्न
शिनोळी बु. (रवी पाटील ) ता. चंदगड (जि. कोल्हापूर) – व्ही. के. चव्हाण पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कार्वे पाटणेफाटा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात चौथे पुष्प गुंफण्यासाठी भाजपा महिला मोर्चा, कर्नाटक राज्याच्या सचिव डॉ. सोनाली सरनोबत प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरण या विषयावर त्यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी दूध संस्थेच्या चेअरमन चंद्रकला बामुचे होत्या. प्रारंभी दीपप्रज्वलन डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रिलस्टार मानसी पाटील हिचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
महिला सक्षमीकरणावर भाषण देताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले की, "महिला सक्षमीकरण हा केवळ महिलांचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा विषय आहे. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, आरोग्य, डिजिटल साक्षरता आणि समाजात समता प्रस्थापित करणे ही सक्षमीकरणाची मूलभूत तत्त्वे आहेत."
यावेळी रवी पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच कॉलेजच्या वतीने डॉ. सोनाली सरनोबत यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य उत्तम पाटील, एनसीसी प्रमुख प्रा. कृष्णा कलजी सर यांचीही उपस्थिती होती.
डॉ. सरनोबत यांनी महिलांना संघटित राहण्याचे आणि एकमेकींना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले. महिलांनी नोकरी, व्यवसाय आणि उद्योजकतेकडे वळावे, तसेच निर्णयक्षमता वाढवून समाजाच्या सर्व क्षेत्रांत नेतृत्व करावे, असे त्यांनी सांगितले.
या हळदी-कुंकू समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात अनेक मान्यवर महिला, विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Post a Comment
0 Comments