Type Here to Get Search Results !

६वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आज

 ६वे अखिल भारतीय बेळगाव  मराठी साहित्य संमेलन आज  

छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत मराठी साहित्याचा उत्सव


बेळगाव, ६ एप्रिल –

मराठी साहित्याची तेजस्वी परंपरा आणि सीमाभागातील मराठी भाषेच्या अस्मितेला उजाळा देणारे ६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज बेळगावच्या छ. शिवाजी महाराज संमेलन नगरी, मराठा मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने या साहित्य महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ९ वाजता भव्य ग्रंथदिंडीने संमेलनाचा शुभारंभ होणार आहे.

या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत ज्येष्ठ साहित्यिक आणि पनिपतकार विश्वास पाटील. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून मराठी साहित्यास नवी वैचारिक दिशा लाभेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संमेलनाचे उद्घाटन मराठा मंदिरचे चेअरमन व  उद्योजक आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते होणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून डी. बी. पाटील, आणि प्रास्ताविक अ‍ॅड. सुधीर चव्हाण सादर करतील.


दुपारी १ वाजता होणाऱ्या विशेष सत्रात डॉ. संजय कळमकर (आहिल्यानगर) ‘साहित्यानंद’ या विषयावर आपले विचार मांडतील. रसिक प्रेक्षकांसाठी हे सत्र चिंतन-मननाची पर्वणी ठरणार आहे.

लोकसंस्कृतीचा जागर होणार रंगतदार!

दुपारी ३ ते ५ या वेळेत शाहीर अभिजित कालेकर व त्यांच्या चमूकडून ‘जागर लोकसंस्कृतीचा’ हा लोककलामय कार्यक्रम सादर केला जाईल. भारुड, पोवाडे, लोकनाट्य यांच्या माध्यमातून प्रबोधन आणि मनोरंजनाचा मेळ साधला जाणार आहे.


मान्यवर साहित्यिकांची मांदियाळी...

या संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, तसेच कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांचीही उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन सत्रात अनेक मान्यवर साहित्यिक आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती संमेलनाची शान वाढवणार आहे.


हजारो रसिकांची उपस्थिती...

सीमाभागातून आणि महाराष्ट्रातून आलेले हजारो साहित्यप्रेमी आज या साहित्यिक पर्वणीचा आनंद लुटणार आहेत. हे संमेलन मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा जागर करणारे ऐतिहासिक ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments