Type Here to Get Search Results !

चंदगड मराठी अध्यापक संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

 "यशाचा राजमार्ग मेहनतीतून जातो" – सचिन शिंदे 

चंदगड मराठी अध्यापक संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

नूतन चेअरमन सचिन शिंदे यांचा सत्कार करताना अध्यक्ष मोहन पाटील 

चंदगड : ( संजय साबळे )"आयुष्यात यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग न पत्करता प्रामाणिकपणे कष्ट घेणं गरजेचं आहे. कारण प्रामाणिक प्रयत्नांनी मिळालेलं यशच खऱ्या अर्थाने टिकतं आणि जीवनाला दिशा देतं," असे स्पष्ट मत कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. सचिन शिंदे यांनी व्यक्त केले.


चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात ९५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या शिक्षकांचा आणि पालकांचा गौरव करण्यात आला. या गौरव समारंभात श्री. शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


"मातृभाषेतूनच शिक्षणाची सुरुवात व्हावी" – एम. एम. तुपारे

या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत प्रा. एम. एम. तुपारे यांनी मातृभाषेच्या महत्त्वावर भर देत म्हटलं की, "मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे विद्यार्थ्याच्या मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी अधिक सक्षम ठरते. शिक्षणाची खरी पायाभूत घडण मातृभाषेतूनच होते. म्हणून मातृभाषेतून च शिक्षणाची सुरुवात व्हावी ."


तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सिद्धेश्वर हायस्कूल, कुदनूर येथील प्राजक्ता कुरणे आणि रामलिंग हायस्कूल येथील मलप्रभा कुरणे यांनी मराठी विषयात 97 गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. दोघींनाही विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय तालुक्यातील तब्बल 60 विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.


सेवानिवृत्त प्रा. के. आर. गावडे यांचा गौरव कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रा. के. आर. गावडे यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली.


यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. एन. शिवणगेकर यांनी केले. स्वागताध्यक्ष म्हणून अध्यापक संघाचे अध्यक्ष मोहन पाटील होते. यावेळी दयानंद पाटील, राघवेंद्र इनामदार, मुख्याध्यापक पांडुरंग मोहनगेकर व कु.श्रावणी पाटील यांची मनोगते झाली.

यावेळी संजय साबळे, बी. एन. पाटील, कमलेश कर्णिक, मुख्याधापक आनंद पाटील, एच. आर. पाऊसकर, एस. पी. पाटील आणि एस .जे. मोहनगेकर , कमलाकर कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी सूत्रसंचालन  रवींद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन व्ही. एल. सुतार यांनी केले.

Post a Comment

0 Comments