Type Here to Get Search Results !

अनुदान टप्पा वाढीचा ऐतिहासिक निर्णय जाहीर!

 शिक्षक समन्वय संघाच्या शाळा बंद आंदोलनाला अभूतपूर्व यश 

अनुदान टप्पा वाढीचा ऐतिहासिक निर्णय जाहीर!


मुंबई ( आझाद मैदान )  दिनांक ९ जुलै २०२५

राज्यभरातील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भातील न्याय्य मागण्या घेऊन शिक्षक समन्वय संघ यांनी पुकारलेल्या ८ व ९ जुलै २०२५ रोजीच्या शाळा बंद आंदोलनाला अभूतपूर्व यश लाभले आहे.

आझाद मैदानावर २०,००० हून अधिक शिक्षकांच्या प्रचंड गर्दीने आणि आवाजाने सत्ताधारी व विरोधकांना जाग येऊन शिक्षकांच्या वेदनांना अखेर न्याय मिळवून देण्यात यश आले आहे. या लढ्याचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष मा. खंडेराव जगदाळे सर यांनी जबर आत्मविश्वासाने केले.


✊ आंदोलनाची पार्श्वभूमी

दि. ५ जून २०२५ पासून सुरू असलेल्या या आंदोलनाने एक महिन्याचा कालावधी ओलांडला तरीही शासनाकडून अपेक्षित निर्णय झाला नव्हता. अधिवेशन सुरू असताना सरकारकडून होणारे दुर्लक्ष पाहून जगदाळे सरांनी ८ व ९ जुलै रोजी राज्यभरातील शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले.

या आवाहनास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारो शिक्षक आझाद मैदानात एकवटले आणि आपली मागणी ठामपणे मांडली. शिक्षकांचा हा महापूर पाहून शासनालाही निर्णय घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.


👥 राजकीय नेत्यांचा अभूतपूर्व पाठिंबा

या आंदोलनाला विविध पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार विनायक राऊत, खासदार निलेश लंके ,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार जयंत पाटील, भास्कर जाधव, मंगेश चिवटे व सर्व शिक्षक आमदार यांसारख्या दिग्गजांनी आझाद मैदानावर उपस्थित राहून आंदोलनास समर्थन दिलं.

विशेषतः आमदार रोहित पवार हे दिवसरात्र आझाद मैदानावर शिक्षकांसोबत ठिय्या देऊन बसले. प्रसारमाध्यमांनीही यास मोठे महत्त्व दिले आणि शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले.


शासनाने घेतलेले निर्णय

दि. ९ जुलै २०२५ रोजी शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार व मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले:

२०%, ४०% व ६०% वेतन मिळत असलेल्या शाळांना पुढील टप्पा मंजूर – आता ८०% टप्पा मंजूर
त्रुटीपुर्तीत अडकलेल्या शाळांना संबंधित टप्पा देण्यात येणार
 २०% घोषित व पात्र ठरलेल्या शाळांनाही २०% अनुदान मंजूर
१ जुलै २०२५ पासून वाढीव वेतनाचा अंमल
 अंमलबजावणीची प्रक्रिया १८ जुलैनंतर सुरू होणार


 शिक्षक समन्वय संघाचा अभिमान

हा लढा  खंडेराव जगदाळे सरांच्या दूरदृष्टी, चिकाटी आणि नेतृत्वगुणांमुळेच यशस्वी झाला. त्यांच्या खांद्याला खांदा लावून राज्यातील सर्व समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी, संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी एकजुट दाखवत हा ऐतिहासिक लढा यशस्वी केला.


 एकजूट आणि संघर्षाची विजयगाथा

मुंबई ,कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, सातारा, सांगली, अकोला, नागपूर अशा राज्यभरातील हजारो शिक्षकांनी मैदानात उतरून जे एकवटलेले शक्तिप्रदर्शन केले, ते आज शिक्षक संघटनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार आहे.


समन्वय संघाकडून विशेष आभार

या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींना, राजकीय नेत्यांना, प्रसारमाध्यमांना, आणि आंदोलनात झोकून दिलेल्या सर्व कार्यकर्त्यांना शिक्षक समन्वय संघ, सोलापूर यांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


"हा लढा शेवटचा नाही, पण आजचा विजय प्रत्येक शिक्षकाच्या लढ्याला समर्पित!"
शिक्षक समन्वय संघ 'हुंकार 'आंदोलन 

Post a Comment

0 Comments