Type Here to Get Search Results !

परीक्षा म्हणजे युद्ध नाही, संधी आहे!- वैभव पाटील

 परीक्षा म्हणजे युद्ध नाही, संधी आहे!- वैभव पाटील

दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’

दहावीच्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षेचा मंत्र



चंदगड :येथील दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “परीक्षा पे चर्चा” हा प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात चंदगड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, आत्मविश्वास आणि मानसिक तणावमुक्त तयारीबाबत मौलिक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन प्रा. एन. एस. पाटील होते. वैभव पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “आजचे युग स्पर्धेचे आहे. मोठी स्वप्ने पाहून त्या स्वप्नांचा सातत्याने पाठलाग करणे हेच विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. नियमित वाचनामुळे विचारांची कक्षा रुंदावते; म्हणून दररोज वर्तमानपत्र वाचणे काळाची गरज आहे.”


अध्यक्षीय भाषणात प्रा. एन. एस. पाटील यांनी आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “परीक्षेच्या तयारीत आत्मविश्वास अत्यंत आवश्यक आहे. आत्मविश्वासासारखी दुसरी कोणतीही दैवी शक्ती नाही. नियमित, नियोजनबद्ध अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर परीक्षेच्या काळात तब्येतीची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.आत्मविश्वास, अभ्यास आणि आरोग्याचा मंत्र हेच यशाचे गमक आहे."

प्राचार्य आर. पी. पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी अभ्यासपद्धती, वेळेचे नियोजन, ताण-तणाव व्यवस्थापन यासंदर्भात प्रश्न विचारले. या चर्चेत खुशी गावडे, आर्या निळकंठ, अनन्य गुरव, वेदांत निळकंठ आणि प्रथमेश बुरुड यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी माईनकर, केंद्रप्रमुख एन. एस. पाटील, टी. व्ही. खंडाळे, जे. जी. पाटील, ओंकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले तर आभार शरद हदगल यांनी मानले.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून परीक्षेकडे आनंदी, आत्मविश्वासपूर्ण आणि आरोग्यदायी दृष्टिकोनातून पाहण्याची दिशा देणारा ठरला.

Post a Comment

0 Comments