Type Here to Get Search Results !

शिनोळीत राजर्षी शाहू विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

 🌟 उदात्त स्वप्नेच यशाचा मार्ग दाखवितात – संजय साबळे 🌟

राजर्षी शाहू विद्यालयात दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात


शिनोळी : (प्रतिनिधी)

“जीवनात कधीही छोटी स्वप्ने पाहू नका. मोठी स्वप्ने पाहताना कष्ट करायला लाजू नका. कारण उदात्त स्वप्नेच यशाचा खरा मार्ग दाखवतात. आयुष्यात स्पर्धेशिवाय जगण्यात मजा नाही; स्पर्धाच आपल्याला नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा देते,” असे प्रेरणादायी प्रतिपादन कवी, लेखक व उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक संजय साबळे यांनी केले.


ते राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. येथे आयोजित इयत्ता दहावीच्या निरोप व सदिच्छा समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे सचिव श्री. बी. डी. तुडयेकर होते, तर केंद्रप्रमुख आप्पाराव पाटील यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. 


अध्यक्षीय भाषणात श्री. बी. डी. तुडयेकर यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, सातत्य आणि संस्कार यांच्या बळावर जीवनात मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले.


आपल्या प्रभावी व ओघवत्या भाषणात साबळे यांनी विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत पेटवली. “गंभीर परिस्थितीत शांतपणे विचार केला, तर मोठे प्रश्नही चुटकीसरशी सोडवता येतात. परीक्षेला घाबरू नका; ती तुमच्या क्षमतेची संधी आहे,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या भाषणाने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.


यावेळी केंद्रप्रमुख आप्पाराव पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले. “यश मिळवायचे असेल, तर स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. संघर्षाशिवाय व्यक्तिमत्त्व घडत नाही,” असे ते म्हणाले.



कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.डी. तुडयेकर यांच्याहस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख वक्ते संजय साबळे सरांचा यांचा शाल , श्रीफळ व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला .


वर्गशिक्षक रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांच्या प्रवासाचा भावनिक आढावा घेतला. आठवीपासून दहावीपर्यंतचा शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक विकासाचा प्रवास त्यांनी मनोगतातून उलगडला.


यावेळी विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. श्रेया राजू बेळगावकर, जानवी विनोद सुतार, विश्रांती वैजनाथ मेणसे, श्रेया महेश बोकमूरकर, संध्या संजय कांबळे, श्रावणी परशराम कांबळे व साक्षी कृष्णा मेणसे यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला.

मुख्याध्यापक एन. टी. भाटे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 


समारंभात दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला कृतज्ञतेपोटी ‘तिजोरी’ ही भेटवस्तू  दिली. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीप्रती कृतज्ञता व्यक्त करत भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. या प्रसंगी वातावरण भावनिक झाले.


यावेळी शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विक्रम तुडयेकर यांनी मानले.



Post a Comment

0 Comments