श्री दत्त हायस्कूल राजगोळी बुद्रुक येथे दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात
कोवाड (प्रतिनिधी) :श्री दत्त हायस्कूल राजगोळी बुद्रुक येथे मंगळवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी इयत्ता १० वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. के. पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मारुती सातबा राजगोळे (मुख्याध्यापक, मराठी विद्या मंदिर राजगोळी बुद्रुक) उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राजगोळे सर यांनी विद्यार्थ्यांना ‘०’ (शून्य) या संख्येचे उदाहरण देत प्रेरणादायी विचार मांडले. “शून्याला बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार केला तरी ते शून्यच राहते; पण त्याच्या बाजूला दुसरी संख्या आली की त्याची किंमत वाढते. तसेच चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहिल्यास आपल्या जीवनाची किंमत वाढते,” असे सांगून त्यांनी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जोपासण्याचा संदेश दिला. प्रत्येकाने स्वतःची ओळख स्वतःच्या कर्तृत्वातून निर्माण करावी व आपल्या अंगी असलेल्या क्षमतांची जाणीव ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते, असा आशावादी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
शाळेचे मुख्याध्यापक माननीय ए. के. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून वर्षभरातील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक रामचंद्र हनमंत पाटील, शिक्षक एस. ए. पाटील सर, सुरेखा पाटील मॅडम, एस. के. पाटील सर यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. गुरव सर यांनी प्रभावीपणे केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
समारंभामुळे विद्यार्थ्यांच्या मनात नव्या स्वप्नांना पंख लाभले असून आत्मविश्वासाने पुढील शैक्षणिक वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली.

Post a Comment
0 Comments