सरिता शिंदे यांना 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने' सन्मानित
कोल्हापूर, दि. २६ जून : १५२ व्या राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त गंगाधर वृत्तपत्राच्या वतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषदे'त शैक्षणिक, सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सरिता शिंदे (कोल्हापूर) यांना 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले .
मोहमेडन एज्युकेशन सोसायटी हॉल, दसरा चौक, कोल्हापूर येथे झालेल्या या सोहळ्यात भुदरगडच्या माजी सभापती अक्काताई नलवडे व सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते सरिता शिंदे यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.मोहमेडन एज्युकेशन सोसायटी हॉल, दसरा चौक, यावेळी कोल्हापूर येथे झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.शंकर अंदानी (अहिल्यानगर) होते. पद्मश्री उदय देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सरिता शिंदे यांनी १९९६ ते २००२ या कालावधीत प्राथमिक शाळेत संगीत शिक्षिका म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांना वयोगटानुसार संस्कारगीते, देशभक्तीपर गीते तसेच समूहगीतांचे प्रशिक्षण दिले. याच काळात त्यांनी विविध ठिकाणी संस्कार शिबिरांमध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्ये रुजविण्याचे कार्य केले. कोरगावकर हायस्कूल आणि वि. स. खांडेकर प्रशाला या शाळांच्या समूहगीत पथकांना त्यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्यामुळे २०१० पर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने यश संपादन झाले.
यानंतर त्यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी स्वतःला वाहून घेतले. शाळेतील अप्रगत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याबरोबरच मराठी दिन नावीन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्याची परंपरा सुरू केली. संवादलेखन, सादरीकरण, भाषिक कौशल्ये, विरामचिन्हांचा योग्य वापर आणि मराठीच्या विविध बोलीभाषांचा अभ्यास यावर त्यांनी विशेष काम केले. विविध भागांतील बोलीभाषिक व्यक्तींशी संवाद साधून त्यांनी तयार केलेले हस्तलिखित मराठी अध्यापक त्रैमासिकाच्या 'बोलीभाषा विशेषांकात' प्रकाशित झाले.
सध्या त्या आंतरभारती विचारांचा प्रचार व प्रसार करत असून, विविध भाषांतील समूहगीतांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगणे तसेच भाषिक आणि सांस्कृतिक जाणीवा विकसित करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत.
त्यांच्या बहुआयामी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि भाषिक कार्याची दखल घेऊन त्यांना 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानाबद्दल शिक्षण, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

Post a Comment
0 Comments