Type Here to Get Search Results !

शिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात

 शिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्ज

     मूर्तीकार नामदेव सुतार  गणेश मूर्तींना शेवटचा हात फिरवताना ...

शिनोळी बु. (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थी अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने चंदगड तालुक्यातील शिनोळी परिसरातील गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या मूर्तींना आकर्षक रंगसंगती देत मूर्तिकारांकडून रंगकामाचा शेवटचा हात फिरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


शिनोळी औद्योगिक वसाहतीतील *मूर्तिकार नामदेव नारायण सुतार* यांच्या कार्यशाळेत गेल्या तीन-चार महिन्यांपासून गणेशमूर्ती निर्मितीचे काम सुरू आहे. या कामात त्यांच्या *पत्नी लता नामदेव सुतार, सहकारी श्रुती ईश्वर सुतार, ऋतिक दशरथ सुतार तसेच त्यांचा चिमुकला मुलगा प्रिन्स नामदेव सुतार* हेही उत्साहाने सहभागी झाले आहेत.


या कार्यशाळेत प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्यात आलेल्या साडेतीनशेहून अधिक घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती आकर्षक रंगकामाने सज्ज करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मूर्ती भक्तांच्या मनाला भावावी, तिचे रूप अधिक आकर्षक दिसावे यासाठी मूर्तिकार कुटुंबाकडून बारकाईने अंतिम रंगकाम व सजावटीचे काम करण्यात येत आहे.


नामदेव नारायण सुतार हे उत्कृष्ट मूर्तिकार असून लाकडी फर्निचर व आतील सजावटीच्या कामातीलही कुशल कारागीर म्हणून परिचित आहेत. त्यांच्या कार्यशाळेत तयार होणाऱ्या गणेशमूर्तींना परिसरातील गणेशभक्तांकडून दरवर्षी चांगली मागणी असते. गणेशभक्त येथे येऊन आपल्या आवडीची मूर्ती घेऊन भक्तिभावाने ती घरी अथवा मंडळाच्या मंडपात प्रतिष्ठापित करतात.


गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तींचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार कुटुंबाची अक्षरशः धांदल उडाली आहे. रंगकामाच्या अंतिम टप्प्यात प्रत्येक मूर्तीच्या डोळ्यांपासून मुकुट, अलंकार व विविध रंगछटांपर्यंत बारकाईने लक्ष दिले जात आहे.


दरम्यान, शिनोळी बु. गावचे माजी सरपंच नितीन नारायण पाटील* यांनी कार्यशाळेला सदिच्छा भेट देऊन मूर्तिकार नामदेव सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. त्यांच्या मेहनतीला शुभेच्छा देत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या पारंपरिक कलेचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

Post a Comment

0 Comments