कुद्रेमानीत वरुणराजाच्या कृपेसाठी ‘भूवाच्या पावलां’ची जत्रा
पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधवांकडून पारंपरिक श्रद्धेने पूजाअर्चा
कुद्रेमानी, दि. २७ सप्टेंबर २०२६ :पावसाने दडी मारल्याने कुद्रेमानी परिसरातील पिके वाळण्याची स्थिती निर्माण झाली असून, पिण्याचे पाणी, शेती तसेच जनावरांसाठी पाण्याची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वरुणराजाची कृपा होऊन पुन्हा पाऊस पडावा, कुद्रेमानीची भूमी पाण्याने चिंब व्हावी आणि शेतकऱ्यांची पिके बहरावीत, या श्रद्धेतून कुद्रेमानी येथे रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी *भूवाच्या पावलां* ची पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजा करण्यात आली.
कुद्रेमानी येथील मानीच्या कावलात कुद्रेमानी , तडशिनहाळ व तुर्केवाडी सिमेवर ‘भूवाची पावले’ आहेत. पावसाने काही दिवस दडी मारल्यास गावकरी एकत्र येऊन या पावलांची पूजा-अर्चा करतात. त्यानुसार आज गावातून वाजतगाजत फेरी काढण्यात आली. मानकरी गावडा यांच्या नेतृत्वाखाली ‘भूवाच्या पावलां’जवळ गऱ्हाणे घालून दूध, दही, तूप व पाण्याने अभिषेक करण्यात आला.
यानंतर भूवाच्या पावलांवर शेणाची थाप देण्यात आली. वरुणराजाची कृपा होऊन पाऊस पडावा आणि या पावलांवर थापलेले शेण पावसाच्या पाण्याने धुऊन जावे, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. या परंपरेमागे पाऊस पुन्हा सुरू व्हावा, कुद्रेमानीची भूमी थंड व्हावी, विहिरी-जलस्रोतांना पाणी मिळावे आणि हातातोंडाशी आलेली पिके सुकून जाऊ नयेत, अशी शेतकरी बांधवांची मनोभावे प्रार्थना आहे.
पावसाअभावी शेतीवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी या पारंपरिक विधीत सहभागी होत बळीराजासाठी चांगला पाऊस पडावा, पिकांना जीवदान मिळावे आणि गावातील जनजीवन सुखी-समृद्ध व्हावे, अशी सामूहिक भावना व्यक्त केली.
या विधीप्रसंगी मानकरी गावडा धोडिंबा पाटील, पुजारी गुरव शिवाजी गुरव, मारुती गोवेकर व ताबड्याप्पा हरिजन यांच्यासह रवी पाटील, दीपक पाटील, नाना पाटील, बाळू कदम, सुरेश पाटील, प्रकाश यळळूकर, रवळू देवण, शंकर पाटील, सुरेश पाटील, पिंटू काकणकर, अरुण देवण , विनायक पाटील , लक्ष्मण राजगोळकर , नारायण बिजगर्णीकर, मधु पन्हाळकर , परशराम काकतकर , विष्णू गुरव ,खाचो पाटील , सागर पाटील , बी के पाटील , रामचंद्र रवळू पाटील ,लक्ष्मण व्हन्नाप्पा पन्हाळकर , रोहन पाटील , मनोहर लोहार तसेच गावातील अनेक पुरुष व शेतकरी बांधव उपस्थित होते.
कुद्रेमानीच्या मातीत पिढ्यान्पिढ्या जपली गेलेली ही लोकपरंपरा, श्रद्धा आणि निसर्गाशी असलेले नाते आजच्या पूजाविधीतून पुन्हा अधोरेखित झाले.




Post a Comment
0 Comments