Type Here to Get Search Results !

सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकावर शिवाजीराव पाटील यांच्याहस्ते दीपोत्सवाचा शुभारंभ

                   नेसरीत भव्य दीपोत्सव सोहळा
महाराष्ट्र भूषण सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाला अभिवादन आणि दीपोत्सव जल्लोषात 

  शिवाजीराव पाटील यांनी स्मारकाला अभिवादन करताना

 नेसरी, चंदगड: दिवाळीचा पहिला दिवा त्या देवासाठी ज्यांच्यामुळे आम्ही दिवाळी साजरी करतोय, त्या छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांसाठी. या भावनांनी प्रेरित होऊन नेसरी येथे महाराष्ट्र भूषण, स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकस्थळी अभिवादन करण्यात आले. यावेळी नेसरी आणि परिसरातील तरुणांनी हजारो दिव्यांनी आणि विद्युत रोषणाईने स्मारक तेजोमय केले.


या दीपोत्सव सोहळ्याचा शुभारंभ चंदगड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आणि समाजसेवक शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करून झाली. नंतर सर्वांनी महादेव मंदिरात महाआरती करत 'हर हर महादेव'च्या जयघोषात स्मारक परिसर गूंजला. यावेळी सात वीरांच्या आठवणीसाठी उभ्या असलेल्या तलवारींना वंदन करून "जय शिवाजी, जय भवानी"च्या गगनभेदी घोषणांनी वातावरण भारावून गेले.


शिवाजीराव पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वराज्य स्थापनेतील प्रतापराव गुजर यांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव केला. त्यांनी तरुणांना संबोधित करत, "प्रतापराव गुजर हे एक अपार शौर्य आणि निष्ठेचे प्रतीक होते. आजचा दिवस म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे," असे सांगितले. तसेच त्यांनी पुढे म्हटले की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी आदरांजली आहे. युवकांनी राष्ट्रप्रेम, समाजसुधारणा आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आपले योगदान दिले पाहिजे."

यावेळी प्रसाद हल्याळी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत, सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नेसरीतील ऐतिहासिक योगदानाचा आढावा घेतला. "प्रतापराव गुजर यांची शौर्यगाथा प्रत्येक तरुणाच्या हृदयात प्रेरणा निर्माण करणारी आहे. त्यांच्या बलिदानातून आपण समाजहिताचे धडे गिरवले पाहिजेत," असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या शेवटी धारकरी आणि मावळ्यांनी शिवजागर सादर केला, ज्यामध्ये राष्ट्रभक्तीचा ध्येयमंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या दीपोत्सवाने उपस्थितांमध्ये नवचेतना आणि देशसेवेचा वसा घेण्याची प्रेरणा निर्माण झाली.

Post a Comment

0 Comments