अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांची बाल मावळ्यांच्या गडकिल्ल्यांना भेट; शिवरायांच्या आदर्शांचे बालमनावर कोरण्याचे आवाहन
![]() |
| किल्ल्याची प्रतिकृती पाहणी करताना शिवाजीराव पाटील |
चंदगड (प्रतिनिधी): अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी दिपावलीनिमित्त चंदगड मतदारसंघातील बाल मावळ्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांना भेट देऊन त्यांचे कौतुक केले. त्यांनी बालकांच्या कलेतील कल्पकता आणि ऐतिहासिक महत्त्वाचे दर्शन घडवणाऱ्या या प्रतिकृतींना पाहून आनंद व्यक्त केला.
शिवाजीराव पाटील यांनी या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचे आदर्श बालमनावर कोरण्याची गरज स्पष्ट केली. "गड-किल्ले केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीत, तर ते शिवरायांच्या शौर्य आणि धैर्याचे प्रतीक आहेत. या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून आजच्या पिढीला शिवरायांचे विचार आणि त्यांचा वारसा समजला पाहिजे," असे त्यांनी आवर्जून सांगितले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, "आजची पिढी जर शिवरायांचा वारसा जपली, तर हिंदू समाज सुरक्षित आणि एकत्रित राहील. शिवरायांचे आदर्श मुलांच्या मनात रुजवणे काळाची गरज आहे."
बाल मावळ्यांनी साकारलेल्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींनी शिवरायांच्या महान कार्याचे प्रतिबिंब उभे केले आहे. यामुळे स्थानिक युवकांमध्ये देशभक्तीची भावना आणि इतिहासाच्या गौरवाची प्रेरणा जागवली गेली आहे.
शिवाजीराव पाटील यांच्या भेटीने बाल मावळ्यांसह स्थानिक युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, तर त्यांनी बाल मावळ्यांच्या सृजनशीलतेचे विशेष कौतुक केले. "अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये शिवरायांविषयीची आस्था आणि आदर वाढेल, आणि हीच भावी पिढी शिवरायांचे विचार आचरणात आणेल," असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्थानिकांनीही बाल मावळ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले, आणि शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात उत्साह संचारला.

Post a Comment
0 Comments