डॉ.नंदाताई कुपेकर-बाभुळकर यांची महिला शेतकऱ्यांना दिलासा, चंदगडच्या विकासासाठी परिवर्तनाची हाक
![]() |
| ताईंनी शेतकरी ,कष्टकरी महिलां भगिनींची भात कापणी सुरू असताना घेतली भेट |
चंदगड ( प्रतिनिधी ):चंदगड तालुक्यात सध्या पिकांची कापणी सुरू असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर संकट आणले आहे. पिकं तोंडाशी आली असताना पावसामुळे ती भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या चंदगड मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. नंदाताई कुपेकर-बाभुळकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांनी कष्टकरी महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि या संकटावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
निसर्गाच्या या कोपाला सामोरे जात असलेल्या शेतकऱ्यांबद्दल नंदाताईंनी कणखर शब्दांत बोलताना सांगितले, "निसर्गाने आपला कहर दाखवला असला तरी शेतकऱ्यांमध्ये या संकटाशी दोन हात करण्याची जिद्द कायम आहे. मात्र, सध्याच्या आमदारांनी विकासात खोडा घातला आहे. आता चंदगडला परिवर्तनाची गरज आहे."
सध्याचे आमदार राजेश पाटील यांच्यावर कडक शब्दांत टीका करत नंदाताईंनी म्हटले, "आमदार पाटील यांनी चंदगडच्या विकासाचे काम थांबवले आहे. त्यांच्या काळात विकास खुंटला आहे आणि चंदगडकरांनी हे विसरू नये. माझे वडील स्व. बाबासाहेब कुपेकर आणि माझी आई माजी आमदार संध्याताई कुपेकर यांनी या भागाच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. आता तोच वारसा पुढे नेण्याची वेळ आली आहे."
शेतकरी, कामगार, आणि श्रमिकांनी या निवडणुकीत परिवर्तन घडवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवावी, असा संदेश देत नंदाताईंनी विकासाचे स्वप्न पुन्हा चंदगडमध्ये साकार करण्याची ग्वाही दिली.
"शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली आम्ही चंदगडमध्ये पुन्हा विकासाची गंगा आणणार आहोत," असे ठामपणे सांगत नंदाताई कुपेकर-बाभुळकर यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

Post a Comment
0 Comments