Type Here to Get Search Results !

ग्रामीण भागात मराठी संस्कृतीच्या संवर्धनाचे आवाहन - आर. एम. चौगुले

 सावगाव येथे युवा आघाडीतर्फे नृत्यस्पर्धा उत्साहात संपन्न

ग्रामीण भागात मराठी संस्कृतीच्या संवर्धनाचे आवाहन - आर. एम. चौगुले


सावगाव: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा व महिला आघाडी शाखा सावगाव यांच्या वतीने रविवारी आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. अध्यक्षस्थानी मारुती कदम होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. यावेळी बोलताना आर. एम. चौगुले म्हणाले, “ग्रामीण भागातील लोककला जपायची असल्यास मराठी भाषा व संस्कृती टिकली पाहिजे. मराठी भाषेसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठबळ देणे ही काळाची गरज आहे. विविध प्रलोभनांना बळी न पडता, सीमाभागातील मराठी भाषिकांनी समितीसोबत खंबीर राहावे.”

मराठी संस्कृतीचे महत्त्व: डॉ. नितीन राजगोळकर यांनी भाषणात मराठी संस्कृती सीमाभागात टिकून असल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, “अशा प्रकारच्या डान्स किंवा इतर स्पर्धांमुळे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते.”

माजी ता. पं. सदस्य कृष्णा हुंदरे यांनी सावगाव, मंडोळी आणि हंगरगे गावांना समितीचा बालेकिल्ला म्हणत आजही येथील लोक समितीच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्षपदी राजू किणयेकर यांची निवड झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेत बेळगाव, सांगली, मिरज, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील कलाकारांनी सहभाग घेतला. विविध प्रकारच्या नृत्यप्रकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर कदम यांनी केले. यावेळी निंगाप्पा मोरे, नारायण कडलीकर, माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे, माजी ता. पं. सदस्या निरा काकतकर, माजी ता. पं. सदस्या कमल मन्नोळकर, चेतन पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, लक्ष्मण हिरोजी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाने ग्रामीण भागातील मराठी संस्कृती व कलांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. स्पर्धेतील कलाकारांचे कौतुक करत, पुढील काळातही असे उपक्रम राबवण्याचे आश्वासन आयोजकांनी दिले.

Post a Comment

0 Comments