महिलांनी महिलांचा आदर करा - डॉ.सरिता बिडकर
मराठा महिला मंडळाचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम थाटात संपन्न
बेळगाव (रवी पाटील ) : मराठा महिला मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन लोकमान्य मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. सरिता बीडकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर मार्गदर्शन करताना "महिलांनी महिलांचा आदर केला पाहिजे," असा महत्त्वपूर्ण संदेश दिला.
डॉ. बिडकर यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची आठवण करून देत महिलांना अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी महिलांनी एकमेकींसाठी पाठबळ देत सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. "संस्कार ही आपली ओळख असून, सोशल मीडियाचा मर्यादित वापर करायला हवा," अशी त्यांची तळमळजनक भूमिका उपस्थित महिलांना अंतर्मुख करणारी होती.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. मंडळाच्या अध्यक्षा आरती सांबरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर डॉ. संजीवनी खंडागळे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख डॉ. ज्योती मधुकर यांनी करून दिली. दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमात मंडळातील भगिनींनी गणेश वंदना, पोवाडा, मंगळागौर आणि विनोदी नाटके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीसे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कंग्राळकर, शीतल बर्डे आणि दया शिंदे यांनी केले, तर आभारप्रदर्शन रेणू पवार यांनी केले.
कार्यक्रमाने महिला सक्षमीकरणाचा संदेश देत सामाजिक एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.



Post a Comment
0 Comments