बेळगाव साहित्य संमेलनात शाहिर अभिजित कालेकर यांचा ‘जागर लोक संस्कृतीचा’ कार्यक्रम रंगणार
बेळगाव (प्रतिनिधी ) : ६वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्य, संस्कृती आणि परंपरांच्या जतनासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. या संमेलनात शाहीर अभिजीत कालेकर लिखित ‘जागर लोक संस्कृतीचा’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार असून, तो रसिकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे.
लोक संस्कृती नाट्य कला संस्था, खानापूर-बेळगाव प्रस्तुत ‘जागर लोक संस्कृतीचा’ हा कार्यक्रम मराठी संस्कृती, संस्कार, परंपरा, इतिहास, प्रबोधन, विनोद आणि मनोरंजन यांची उत्तम सांगड घालणारा आहे. लोककला आणि परंपरांचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात गण, गवळण, बतावणी, वासुदेव, हेळवी, नंदीबैल, पोवाडा, भारूड, गोंधळ अशा लोककलेचे विविध प्रकार सादर करण्यात येणार आहेत.
संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यावेळी सुप्रसिद्ध लेखक आणि 'पानिपत'कार विश्वास पाटील संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.
शाहीर अभिजीत कालेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष तयारी केली असून, खानापूर तालुक्यातील दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांमध्येही त्यांनी लोककलेविषयी जागृती केली आहे.
या कार्यक्रमाच्या यशात ज्ञानेश्वर सुतार, गणेश सुतार, सुरज पाटील, विठ्ठल चापगावकर, आरती सुतार, भारती सुतार, दिगंबर सुतार, संतोष गावडे, कृष्णा पाटील, मष्णू पाटील, विनोद मुरकुटे, किसन टक्केकर, प्रशांत पाटील आणि इतर कलाकार आपला विशेष सहभाग नोंदवणार आहेत.
६ एप्रिल २०२५ रोजी मराठा मंदिर, बेळगाव येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होऊन, मराठी संस्कृतीच्या अनमोल ठेव्याचा साक्षीदार बनण्याचे आवाहन परिषदेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील ,जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण व जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे - पाटील यांनी साहित्यप्रेमींना केले आहे.


Post a Comment
0 Comments