प्रा. डॉ. अंजली पाटील-माने यांना 'आदर्श प्राध्यापिका' पुरस्काराने सन्मान
चंदगड : र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. अंजली पांडुरंग पाटील-माने यांना दुर्गा फाउंडेशन, सोलापूरचा ‘आदर्श प्राध्यापिका पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा सन्मान देण्यात आला.
डॉ. अंजली पाटील-माने गेली २५ वर्षे माडखोलकर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाचे अध्यापन करत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २७ शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. तसेच, तीन राष्ट्रीय चर्चासत्रांचे समन्वयक म्हणून काम पाहिले असून, ३२ चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला आहे. त्या १३ कार्यशाळांचे समन्वयक राहिल्या असून, ६८ कार्यशाळांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.
त्यांनी भुईचक्र, आळंबी, जैविक खते, शोभिवंत झाडे, औषधी वनस्पतींचे उपयोग आणि मसाल्याच्या झाडांची लागवड यांसारख्या विषयांवर १५ हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या शैक्षणिक संशोधनाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली असून, लॅप लॅबर्ट ॲकॅडमी, जर्मनी येथून ‘गुलाबी भुईचक्र’ या विषयावर त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
प्रा. डॉ. अंजली पाटील-माने या गडहिंग्लज-महागाव येथील प्रसिद्ध व्याख्याते व महात्मा फुले महाविद्यालयाचे प्रा. पी. डी. पाटील यांच्या पत्नी आहेत.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्यगिरीबद्दल शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments