राकसकोप येथे कै. बी. एस. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
राकसकोप : महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंदे कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी नेते कै. बाबुराव साताप्पा पाटील उर्फ बी. एस. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राकसकोप ग्रामस्थांतर्फे आयोजित शोकसभा सोमवारी भावपूर्ण वातावरणात पार पडली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत बी. एस. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर दोन मिनिटे मौन पाळून सर्व उपस्थितांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
या प्रसंगी त्यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणेही झाली. माजी आमदार मनोहर किणेकर यांनी श्रद्धांजलीपर भाषणात "मी एक उत्तम सहकारी गमावला आहे" अशा शब्दांत आपली भावना व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “कै. बी. एस. पाटील यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षणीय होतेच, पण सीमाभागातील लढ्यांमध्ये त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भूमिकेची भूमिका घेऊन सक्रिय सहभाग दिला.”
या शोकसभेला राकसकोप पंच कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील विविध मान्यवर, मराठी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शोकसभेचे सूत्रसंचालन शिवराज हायस्कूलचे शिक्षक सी. एम. पाटील यांनी केले, तर शेवटी शिवसंत संजय रुक्माण्णा मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment
0 Comments