स्वाती सनदीस न्याय मिळावा – एक लेकरू हरपलं ; ही आत्महत्या की खून ?
बेळगाव ( प्रतिनिधी ) ३१ जुलै २०२५ : स्वाती केदार हिचा विवाह डिसेंबर २०२३ मध्ये श्री. श्रीधर सनदी यांच्याशी झाला. साध्या पार्श्वभूमीतून आलेली आणि मध्यम शिक्षण घेतलेली स्वाती, लग्नात नव्या आशा व स्वप्न घेऊन पाऊल टाकली होती. मात्र, विवाहानंतर तिला नवरा व सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक छळ व क्रौर्याला तोंड द्यावं लागलं.
लग्नाच्या पहिल्यापासूनच तिच्यावर तिच्या रूपावरून, शिक्षणावरून, आणि कौशल्यावरून सातत्याने टीका केली जात होती. तिला कमी लेखलं जात होतं. या मानसिक त्रासाने त्रस्त होऊन तिने माहेरी परतण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सासरी परत जायला नकार दिला होता. मात्र, कुटुंबीयांच्या समजुतीनंतर ती पुन्हा बंगळुरूला परत गेली.
मात्र, तिथे तिचा मानसिक छळ अधिकच वाढला. आणि शेवटी, १२ जुलै २०२५ रोजी तिचा दुर्दैवी अंत झाला.
सासरच्यांनी ही आत्महत्या असल्याचा दावा केला आहे. मात्र, परिस्थिती आणि प्राथमिक निरीक्षणांवरून हे प्रकरण खूनाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्ही ही बाब सहज दुर्लक्षित होऊ देणार नाही. एका तरुण मुलीचा मृत्यू संशयास्पद आणि वेदनादायक परिस्थितीत झाला आहे.
स्वाती सनदी हिचा मृत्यू हा खरंच आत्महत्या आहे की आधीपासूनच नियोजनबद्ध केलेला खून? हा प्रश्न केवळ तिच्या कुटुंबीयांना नव्हे, तर संपूर्ण समाजाला अस्वस्थ करणारा आहे.
आज पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी, बेळगाव यांच्याकडे यासंदर्भात निवेदन सादर केलं आहे आणि स्वाती सनदीस न्याय मिळावा यासाठी मागण्या केल्या आहेत.
निवेदन देताना भाजपच्या नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, स्वातीच्या माहेरकडील नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.
आमच्या प्रमुख मागण्या :
तिच्या मृत्यूच्या परिस्थितींचा तात्काळ व निष्पक्ष तपास करावा
शवविच्छेदन व फॉरेन्सिक अहवाल सार्वजनिक करावेत
संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात यावी
स्वातीच्या माहेरच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावं
आरोपींवर जलदगती न्यायप्रक्रियेद्वारे कठोर कारवाई करावी
या सर्व गोष्टींचा तपशीलवार आणि निष्पक्ष तपास होणे अत्यंत गरजेचे आहे. तिच्या कुटुंबीयांचा ठाम दावा आहे की, "स्वाती आत्महत्या करू शकत नाही." तिच्यावर अन्याय झाला आहे आणि ती एका क्रौर्यपूर्ण कटाचा बळी ठरली आहे.
त्यामुळे हा फक्त एक आत्महत्येचा गुन्हा न मानता, खूनाची शक्यता गृहीत धरून तपास व्हावा, अशीच मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्वाती आता आपल्यात नाही, पण तिच्या आत्म्याला शांती मिळावी . हा लढा न्यायासाठी आहे.प्रत्येकाच्या आवाजात ‘स्वाती’ साठी आवाज उठवूया.एकही स्वाती पुन्हा याचं बळी ठरू नये!

Post a Comment
0 Comments