जिल्हास्तरीय काव्यगायन स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या काव्यगायन कलेला वाव – मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत
![]() |
| मा.शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत मार्गदर्शन करताना |
चंदगड (प्रतिनिधी):“शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण आहेत. तसेच कला, क्रीडा आणि संस्कार यांचा संगम होणे अत्यावश्यक आहे.काव्यगायन म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा उत्सव आहे. मराठी भाषेची गोडी आणि साहित्यिक जाण वाढविण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात. काव्यगायनामुळे सर्जनशीलता वाढीस लागते आणि मराठी भाषेवरील प्रेम दृढ होते,” असे उद्गार माजी शिक्षक दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी काढले.
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय व चंदगड तालुकास्तरीय काव्यगायन स्पर्धा 2025 चा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी शिनोळी खुर्द येथे दिमाखात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी चंदगड तालुका संघाचे मॅनेजर एस. वाय. पाटील यांनी भूषवले.
![]() |
| जिल्ह्यात प्रथम हर्षिता निकमचा सन्मान करताना |
सोहळ्यात कार्यक्रमाध्यक्ष एस. वाय. पाटील, मॅनेजर चंदगड तालुका संघ यांनी चंदगड मराठी अध्यापक संघाचे कौतुक केले. “संघाने घेतलेले उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतात. अशा सर्जनशील उपक्रमांना माझ्याकडून आणि संघाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल,”असे ते म्हणाले.
![]() |
| जिल्ह्यात द्वितीय देवयानी पाटील हिचा सन्मान करताना |
प्रास्ताविकात एम. एन. शिवणगेकर यांनी संघाच्या उपक्रमांचा आढावा घेतला.
कार्यक्रमात चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष मोहन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. “अध्यापक संघ हा फक्त शैक्षणिक नव्हे तर सांस्कृतिक आणि सर्जनशीलतेला वाव देणारा व्यासपीठ आहे.महाराष्ट्रभर मराठीची पताका फडकवण्याचे काम अशा स्पर्धांमुळे घडते.
मुख्याध्यापक प्रकाश पाटील ,प्रा. मासाळ सर व पालक सर्जेराव सुतार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला सोलापूर मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र आसबे, जिल्हा संपर्कप्रमुख समाधान घाडगे, बी. डी.तुडयेकर, प्रा. मासाळ सर , मुख्याध्यापक एम बी पाटील , मुख्याध्यापक व्ही के फगरे , मुख्याध्यापक गुलाब पाटील व मुख्याध्यापक एन.टी.भाटे , व्ही.एल. सुतार व एस पी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .
![]() |
| मुख्याध्यापक एम बी पाटील व मुख्याध्यापक गुलाब पाटील पारितोषिक वितरण करताना |
जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेते
हर्षिता निकम (मुदाळ, भुदरगड), देवयानी पाटील (शिनोळी बुद्रुक, चंदगड), कीर्ती अवदी (कोल्हापूर), जान्हवी पाटील (कोल्हापूर) व पूर्वा वाघे (हेरवाड, शिरोळ) यांनी अनुक्रमे पारितोषिके पटकावली. उत्तेजनार्थ स्वराली जोंगे, श्रेणिक सुतार, सिद्धीका मुल्लानी व आराध्या मोरे यांचा गौरव करण्यात आला.
तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेते
शैलेजा पाटील (राजगोळी), समिधा खोचरे (चंदगड), प्रज्ञा सुतार (नागनवाडी), राजकुमार सोनार (तुर्केवाडी) आणि प्रियंका नांदवडेकर (आमरोळी) यांना पारितोषिके देण्यात आली. स्वराज पाटील आणि चैत्राली पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
हर्षिता निकम हिने “अनामवीरा” ही काव्यरचना सादर केली तर देवयानी पाटील हिने “धरलेल्या पंढरीचा चोर” हा अभंग सादर केला.
सूत्रसंचालन बी.एन.पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन राघवेंद्र इनामदार यांनी केले.
हा काव्यगुणांचा सोहळा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवा वाव देणारा ठरला.





चंदगड मराठी अध्यापक संघ आयोजित काव्यगायन स्पर्धा एक नाविन्यपूर्ण स्पर्धा होती
ReplyDeleteसदर उपक्रमात सहभागी झाल्यामुळे मराठी कवितेची रचना,चाल,लय,सूर इत्यादी चे ज्ञान विदयार्थ्यांना झालेच पण काव्य गायन प्रतिभा असलेले मोती सुद्धा या तुन निदर्शनात आले
पारदर्शक आयोजन,नियोजन,बक्षीस वितरण
मुळे सदर उपक्रम स्तुत्य होता
आयोजकांचे आभार,अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा👏👏🙏🙏💐💐💐