देवयानी तानाजी पाटील हिचा जिल्हास्तरीय काव्य गायन स्पर्धेत यश
चंदगड (प्रतिनिधी) – चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ आयोजित व माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत यांच्या प्रेरणेतून आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय काव्य गायन स्पर्धेत राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बुद्रुक येथील इ. ९ वीची विद्यार्थिनी कु. देवयानी तानाजी पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकावून शाळेचा आणि तालुक्याचा मान उंचावला आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल १३३ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात देवयानीने संत जनाबाईंचे “धरीला पंढरीचा चोर” हे काव्य मनोभावे सादर करून परीक्षकांची दाद मिळवली.
तिच्या यशामागे विद्यालयाचे मराठी विषयाचे उपक्रमशील अध्यापक रवींद्र पाटील सर यांचे मार्गदर्शन तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव सूर्यवंशी , सचिव बी. डी. तुडयेकर आणि मुख्याध्यापक एन. टी. भाटे यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
कु. देवयानी ही शाळेचे लिपिक तानाजी लक्ष्मण पाटील आणि अंगणवाडी सेविका विद्या तानाजी पाटील यांची कन्या असून तिला लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. ती आपल्या वडिलांसोबत कराओके गायनाद्वारे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असते.
देवयानीच्या या यशाबद्दल शाळा परिसरात तसेच गावात सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून भविष्यातही ती अधिक मोठ्या मंचांवर चमकावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments