श्री व्ही. के. चव्हाण पाटील विद्यालय, कागणी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा संपन्न
कागणी ( दिपक पवार ) – श्री व्ही. के. चव्हाण पाटील विद्यालय, कागणी येथे मंगळवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक-शिक्षक सहविचार सभा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या चाचणी परीक्षेचा आढावा, पुढील अभ्यासाचे नियोजन आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. एम. जाधव अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे सचिव श्री. महालिंगेश्वर हगिदळे सर, वर्गशिक्षक श्री. आर. आर. नूली, विषय शिक्षक श्री. आर. के. नाईक, श्री. डी. आर. पवार, सौ. लतिका हगिदळे मॅडम, सौ. राजश्री हगिदळे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या चाचणी परीक्षेतील गुणांचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले. अभ्यासाची गती, कमकुवत विषय, सुधारणा आवश्यक त्या बाबी यावर पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये खुले संवाद साधण्यात आला.
शाळेच्या वतीने नियमित दिनचर्या, सकाळी उठण्याचे फायदे, नियोजित अभ्यास, वाचनाचे महत्त्व, मोबाईलचा मर्यादित वापर, आहार व व्यायामाचे महत्त्व यावर सर्व शिक्षकांनी सखोल मार्गदर्शन केले.
पालकांनी आपल्या पाल्यांच्या अडचणी मांडताना अभ्यासातील अडथळे, आहारातील हलगर्जीपणा, घरातील वातावरण, मोबाईलचे आकर्षण यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. शिक्षकांनी या अडचणी समजावून घेत उपाय सुचवले. विद्यार्थ्यांचे गट पाडून शंका समाधान करण्याचे नियोजनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. जाधव सर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या यशासाठी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांमधील सातत्यपूर्ण सहकार्याचे महत्त्व सांगितले.
सभेचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला. येणाऱ्या महिन्यात पुन्हा एकदा सहविचार सभा घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

Post a Comment
0 Comments