Type Here to Get Search Results !

तासगावकर शुगरच्या काळातील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ; अथर्व -दौलत कंपनीकडून दिलासा

 तासगावकर शुगरच्या काळातील 6 व्या टप्प्यातील थकीत एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा – अथर्व दौलत कंपनीकडून शेतकरीहितासाठी मोठे पाऊल




हलकर्णी (ता. चंदगड) : तासगावकर शुगर कारखान्याच्या काळातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफ.आर.पी. (न्याय्य व लाभदायक दर) रक्कम अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे. अथर्व इंटरट्रेड प्रा. लि. यांच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने थकीत एफ.आर.पी.ची रक्कम शेतकऱ्यांना परत देण्याचे काम सुरू असून, या प्रक्रियेत 6व्या टप्प्यातील पडताळणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची थकीत एफ.आर.पी. रक्कम आज शुक्रवार, दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आली आहे.


अथर्व दौलत कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, चंदगड तालुक्यातील आज अखेर एकूण 137 गावांमधील शेतकऱ्यांच्या खात्यांवर थकीत एफ.आर.पी.ची रक्कम जमा करण्यात आली असून, त्यामध्ये आजच्या 42 गावांचा समावेश आहे. कंपनीकडून सुरू असलेली ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, अचूक आणि शेतकरीहिताचे वचन जपणारी असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.


तासगावकर शुगरच्या काळात अनेक वर्षांपासून थकीत असलेली एफ.आर.पी. रक्कम ही शेतकऱ्यांच्या हक्काची असून, अथर्व दौलत कंपनीने या जबाबदारीचा स्वीकार करून थकीत रक्कम परत देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मागील काही महिन्यांपासून विविध टप्प्यांमध्ये पडताळणी पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर देयक जमा करण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या ते पाचव्या टप्प्यात चंदगड तालुक्यातील 95 गावांतील शेतकऱ्यांना एफ.आर.पी.ची रक्कम मिळाली होती, तर आता 6व्या टप्प्यात आणखी 42 गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


अथर्व दौलत व्यवस्थापनाने सांगितले की, “शेतकऱ्यांचा हक्काचा एकही रुपया प्रलंबित ठेवला जाणार नाही. सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित गावांतील शेतकऱ्यांची एफ.आर.पी. रक्कमही त्वरित त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. शेतकऱ्यांचा विश्वास हेच आमचे बळ असून, त्यांना दिलासा देणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.”


या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून थकीत असलेली एफ.आर.पी. रक्कम अखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. अथर्व दौलत कंपनीने दिलेला दिलासा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नवचैतन्य घेऊन आला आहे. यामुळे आगामी ऊस लागवडीसाठी आर्थिक आधार मिळाला आहे.”


एफ.आर.पी. रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवली जात आहे. प्रत्येक टप्प्यानंतर संबंधित गावांची यादी प्रसिद्ध केली जाते, नावे पडताळणी करून बँकेद्वारे रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. या प्रक्रियेमुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ, विलंब किंवा मध्यस्थ टाळला गेला असून, शेतकऱ्यांना पारदर्शक व विश्वासार्ह सेवा मिळत आहे.


कंपनीच्या प्रयत्नांमुळे ऊस उत्पादकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण झाला आहे. अथर्व दौलत कंपनीने केवळ थकीत रक्कम परत देऊन आपली जबाबदारी पार पाडली नाही, तर शेतकऱ्यांच्या अपेक्षांनाही न्याय दिला आहे. या निर्णयामुळे चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी नव्या हंगामात आत्मविश्वासाने पाऊल ठेवत आहेत.


“शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज व्हावे, त्यांच्या हक्काचा पैसा वेळेवर मिळावा आणि ऊस उद्योग पुन्हा सक्षम व्हावा” या उद्दिष्टाने अथर्व दौलत कंपनीने घेतलेले हे पाऊल संपूर्ण ऊस क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 अथर्व दौलत – शेतकऱ्यांचा विश्वास, ऊस विकासाचा आधार.

Post a Comment

0 Comments