Type Here to Get Search Results !

दौलत साखर कारखाना चालक–कामगार वाद मिटला

 दौलत साखर कारखाना चालक–कामगार वाद मिटला

“कामगार टिकला पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे” — आमदार शिवाजी पाटील




चंदगड (प्रतिनिधी):राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आणि चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या सक्रिय पुढाकारामुळे अखेर दौलत साखर कारखाना चालक आणि कामगारांचा वाद मिटला असून,  उद्यापासून पुन्हा कारखान्याचे चाके फिरणार आहेत.


आमदार शिवाजी पाटील यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या वादावर सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत वाद मिटवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आज आ. शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, कारखाना चालक, कामगार नेते आणि शेकडो कामगारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.


या बैठकीत आमदार पाटील म्हणाले, “चंदगडचा शेतकरी जगला पाहिजे आणि दौलतचा कामगार टिकला पाहिजे. दोघेही हे कारखान्याचे दोन हात आहेत. त्यांच्यात एकता आणि विश्वास राहिलाच पाहिजे.”




बैठकीत अर्थव दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करत काही मुदत मागितली. कामगार प्रतिनिधींनी या प्रस्तावास सहमती दर्शवली आणि वादावर तोडगा निघाला.




या बैठकीत खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले —

कामगारांचा वेतनश्रेणी फरक टप्प्याटप्प्याने देण्यात येईल.

दिवाळी बोनस तत्काळ देण्याचे ठरले.

हलता महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

कामगारांवरील सर्व केसेस मागे घेण्यात येतील.

बडतर्फीच्या नोटिसा रद्द करण्यात येतील.

हंगामी कामगारांच्या समस्याही ठराविक मुदतीत सोडवल्या जातील.

या सर्व मागण्यांचा कायदेशीर करार करण्यात येणार आहे.

 

बैठकीस माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, कारखाना चेअरमन मानसिंग खोराटे, कामगार नेते प्रदीप पवार, अशोक गावडे, शांताराम पाटील, महादेव फाटक, दिपक पाटील, बबनराव देसाई, नामदेव पाटील, सचिन बल्लाळ, उदयकुमार देशपांडे, लक्ष्मण गावडे, अनिल शिवणगेकर, रविंद्र बांदिवडेकर, दिग्विजय देसाई, संग्राम अडकुरकर, अशोक गडदे, दयानंद देवण, देवराज पाटील, लाड साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.


बैठकीत शेतकरी, कामगार आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.या निर्णयामुळे दौलत साखर कारखान्यात नवचैतन्य निर्माण झाले असून शेतकरी व कामगारांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली आहे.




Post a Comment

0 Comments