चंदगड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय!सर्व साखर कारखान्यांकडून ऊसाला ३४०० रुपये दर घोषित
आमदार शिवाजी पाटील यांच्या पुढाकाराने ओलम, दौलत, इको केन कारखान्यांचे ३४०० रुपये दरावर एकमत
चंदगड (प्रतिनिधी ): अतिवृष्टी, वन्यप्राण्यांचा वाढता त्रास, खतांच्या व इनपुट खर्चातील प्रचंड वाढ अशा संकटांच्या छायेत ऊस शेती करणाऱ्या चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार शिवाजी पाटील यांच्या पुढाकाराने चंदगडमधील सर्व साखर कारखाने—ओलम, दौलत आणि इको केन—यांनी ऊसाचा दर ३४०० रुपये देण्यास मान्यता दिली.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आमदार पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या मॅरेथॉन बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांनी ३६०० रुपयांचा दर देण्याची मागणी ठामपणे मांडली होती. आमदार पाटील यांनीही हीच मागणी कारखानदारांसमोर जोरकसपणे मांडली. अखेर अनेक तास झालेल्या चर्चेनंतर ३४०० रुपये या दरावर सर्वानुमते एकमत झाले.
दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे, इको केनचे बाबासाहेब देसाई, ओलमचे युनिट हेड संतोष देसाई, एच.आर. महेश भोसले, विजय मराठे, अश्रू लाड, दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भावकू गुरव, राम पाटील, अशोक कदम, संग्राम अडकुरकर आणि अनेक प्रमुख शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा आवाज ऐकून घेत निर्णायक पाऊल
याआधी मौजे कार्वे येथे आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांची विस्तृत बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या अडचणी, खर्च, नुकसान आणि जिल्ह्यातील इतर कारखान्यांकडून मिळणारे दर याबाबत त्यांनी सर्व तपशील जाणून घेतला. त्यानंतर तातडीने कारखानदारांची बैठक बोलावून निर्णय प्रक्रिया गतिमान केली.
कारखानदारांची भूमिका आणि शेतकऱ्यांची ठाम मागणी
कारखानदारांनी वाहतुकीचे अंतर, विलंबित हंगाम, टोळी समस्या, कामगार संप आणि तांत्रिक अडचणी सांगत ३६०० रुपये देणे कठीण असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी ३३०० चा दर नाकारल्यानंतर चर्चेला मध्यरात्रीपर्यंत रंग चढला आणि अखेर ३४०० रुपयांवर समाधानाचा तोडगा निघाला.
काटामारीसाठी शून्य सहनशीलता
आमदार पाटील यांनी ऊस वजन काटामारीबाबत स्पष्ट भूमिका मांडली—
"काटामारी करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल. शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान सहन केले जाणार नाही."
दौलत कारखान्याचा कामगार संप असो वा सध्याचा ऊस दराचा प्रश्न—दोन्हीही मुद्द्यांवर आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत निस्वार्थी नेतृत्वाची छाप पाडली आहे. नुसत्या घोषणांपेक्षा जाग्यावर निर्णय घेण्याची त्यांची खास शैली प्रांतभर चर्चेत आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेले, त्यांच्या व्यथा समजणारे आणि प्रत्यक्ष कारवाईतून प्रश्न सोडवणारे खरे शेतकरीनेते म्हणून आमदार शिवाजी पाटील यांची ओळख अधिक दृढ होताना दिसत आहे.
या निर्णयामुळे चंदगड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, आगामी हंगामाबाबत आशावाद निर्माण झाला आहे.

Post a Comment
0 Comments