Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिनानिमित्त वेणुग्राम रोटरीतर्फे भव्य रक्तदान शिबिर

 प्रजासत्ताक दिनानिमित्त वेणुग्राम रोटरीतर्फे भव्य रक्तदान शिबिर



बेळगाव : प्रतिनिधी -७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम – बेळगाव यांच्या वतीने अन्न सुरक्षा व औषध प्रशासन (कर्नाटक शासन) तसेच बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशन (आर.) यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत मिलेनियम गार्डन, बेळगाव येथे होणार आहे.

या रक्तदान शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून ₹१,००,०००/- (एक लाख रुपये) रकमेची मोफत अपघात विमा पॉलिसी देण्यात येणार आहे. या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी रक्तदात्यांनी आधार कार्डची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम – बेळगावचे अध्यक्ष रोटेरियन शशिकांत नाईक यांनी सांगितले की, “रक्तदान हे मानवतेचे सर्वोच्च दान आहे. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. प्रजासत्ताक दिनाच्या पावन दिवशी नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे.”

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबचे सचिव रोटेरियन लोकेश व्ही. होंगळ, कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर रोटेरियन डी. बी. पाटील, कार्यक्रम मार्गदर्शक रोटेरियन विनयकुमार बाळीकै व रोटेरियन महेश अंगोलकर, तसेच कार्यक्रम अध्यक्ष रोटेरियन गोपाल उपाध्याय व रोटेरियन जय राठी हे विशेष परिश्रम घेत आहेत. त्यांनीही शहर व परिसरातील नागरिकांना रक्तदान करून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या रक्तदान शिबिरासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, राजस्थानि युवक सेवा मंडळ, मारवाडी युवा मंच, रोटरी बेळगाव साउथ, रोटरी बेळगाव सेंट्रल, रोटरी दर्पण, रोटरी बेळगाव सनराईज, रोटरी बेळगाव नॉर्थ, रोटरी बेळगाव मिडटाउन, रोटरी बेळगाव ई-क्लब, इनर व्हील क्लब ऑफ बेळगाव, रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम – बेळगाव, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन, तालुका फोटोग्राफर्स असोसिएशन, इंडियन रेड क्रॉस सोसायटी तसेच बेळगाव चार्टर्ड अकाउंटंट्स असोसिएशन (BCAA) आदी संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

नागरिकांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश देत हा सामाजिक उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments