Type Here to Get Search Results !

शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त भव्य मानवंदना कार्यक्रम उत्साहात

 शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त भव्य मानवंदना व अभिवादन कार्यक्रम उत्साहात



बेळगाव (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त सकल मराठा समाज, बेळगाव (१८ पगड जाती व १२ बलुतेदार) यांच्या वतीने शिवाजी उद्यान येथे मानवंदना व अभिवादनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. भगव्या पताकांनी सजलेल्या परिसरात ‘जय शिवराय’च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.

बेळगाव व परिसरातील मराठा समाज तसेच मराठी भाषिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. कार्यक्रमात सकल मराठा समाज बेळगावचे समन्वयक किरण जाधव, ॲड. अमर येळूरकर, गुणवंत पाटील, सागर पाटील, ह.भ.प. शंकर बबली महाराज, सुनील बोकडे, सुनील जाधव, राजन जाधव, महादेव पाटील, महिला आघाडी प्रमुख रेणूताई किल्लेकर, भातखंडे, विपुल जाधव, सचिन पाटील तसेच असंख्य समाज बांधव-भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान समन्वयक किरण जाधव यांनी शासनाकडे ठाम मागणी केली की, बेळगाव व परिसरात बहुसंख्य मराठा समाज व मराठी भाषिक नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे शासकीय शिवजयंती मराठा समाजाच्या प्रमुखांना विश्वासात घेऊन साजरी करण्यात यावी. यावर बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील वर्षापासून १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मराठा समाजाच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन साजरी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

महिला आघाडी प्रमुख रेणूताई किल्लेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शिवरायांचे चरित्र आणि विचार प्रत्येकाने अंगीकारले पाहिजेत. “शिवरायांचे आदर्श आचरणात आणल्यासच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

समन्वयक गुणवंत पाटील यांनी प्रत्येक घरामध्ये शिवचरित्र असणे गरजेचे असल्याचे सांगत, जीवनातील प्रत्येक प्रसंगात शिवरायांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावे, असे आवाहन केले.

महादेव पाटील यांनी शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय केला. उपस्थित समाजप्रमुखांनीही आपल्या मनोगतातून शिवरायांच्या कार्याचा गौरव करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, उत्साह आणि शिवभक्तीचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. 

Post a Comment

0 Comments