सौ. शैलजा परशराम गाडेकर यांना 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने' सन्मानित
कोल्हापूर, दि. २६ जून : १५२ व्या राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त आयोजित पहिल्या अखिल भारतीय 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषदे'त शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. शैलजा परशराम गाडेकर यांना प्रतिष्ठेचा 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
मोहमेडन एज्युकेशन सोसायटी हॉल, दसरा चौक, कोल्हापूर येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात पद्मश्री उदय देशपांडे तसेच सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते सौ. शैलजा गाडेकर यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचे पती शिक्षक परशराम अर्जुन गाडेकर यांनी सपत्नीक हा सन्मान स्वीकारला. कार्यक्रमाला शिक्षण, साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील संपादक श्रीराम पच्छिंद्रे , मा. सभापती भूदरगड आक्काताई नलवडे , किसनराव कुऱ्हाडे व कमलाकर वर्टेकर ही मान्यवर उपस्थितीत होते.
मूळच्या कोल्हापूर येथील असलेल्या आणि सध्या जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा, कोकिसरे (ता. पाटण, जि. सातारा) येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. शैलजा परशराम गाडेकर या गेली २१ वर्षे पंचायत समिती शिक्षण विभाग, पाटण अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, शाळेविषयी आत्मीयता वाढावी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी त्या सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवितात. सेमी इंग्रजी वर्ग विकसित करण्यात त्यांचा विशेष हातखंडा असून, त्यांनी शिरळ, आडदेव आणि चेवलेवाडी येथील शाळांमध्ये आदर्श शैक्षणिक कार्य करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली आहे. सध्या त्या जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा, कोकिसरे येथे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश मिळविले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते.
त्यांचे पती परशराम अर्जुन गाडेकर हे बेळगाव जिल्ह्यातील राकसकोप गावचे रहिवासी असून, शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन सौ. शैलजा गाडेकर यांना प्रदान करण्यात आलेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार शिक्षकवर्गासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
त्यांच्या या सन्मानाबद्दल कोल्हापूर, पाटण , बेळगाव तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments