Type Here to Get Search Results !

राघवेंद्र इनामदार यांना 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने' सन्मानित

 राघवेंद्र इनामदार यांना 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्काराने' सन्मानित



कोल्हापूर, दि. २६ जून : १५२ व्या राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त आयोजित पहिल्या अखिल भारतीय 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषदे'त शैक्षणिक, सामाजिक आणि मराठी भाषा संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. राघवेंद्र गणपतराव इनामदार (सर) यांना प्रतिष्ठेचा 'लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.


मोहमेडन एज्युकेशन सोसायटी हॉल, दसरा चौक, कोल्हापूर येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात पद्मश्री उदय देशपांडे तसेच सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते श्री. राघवेंद्र इनामदार यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. या प्रसंगी शिक्षण, साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.



कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द या गावचे सुपुत्र असलेले श्री.राघवेंद्र गणपतराव इनामदार हे राजगोळी हायस्कूल, राजगोळी खुर्द. येथे मराठी विषयाचे ज्येष्ठ अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड, संस्कारमूल्ये आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण रुजविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.


शैक्षणिक कार्याबरोबरच ते सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असून ग्रामदैवत महालक्ष्मी मंडळाचे सल्लागार म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, भाषा संवर्धन आणि समाजप्रबोधनाच्या कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.


त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत यापूर्वी मराठी अध्यापक संघ, कोल्हापूर यांच्या वतीने त्यांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे जेष्ठ मार्गदर्शक आहेत .  'लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार' मिळाल्याने त्यांच्या कार्याला आणखी एक मानाचा तुरा मिळाला आहे.


या सन्मानाबद्दल कोल्हापूर, चंदगड तालुका, बेळगाव सीमाभाग तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून श्री. राघवेंद्र इनामदार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव केला जात आहे.

Post a Comment

0 Comments