Type Here to Get Search Results !

डॉ. स्नेहल शिवाजी पाटील यांचा यशोदा सौहार्द सोसायटीत सत्कार

 कुद्रेमानीच्या कन्येचा वैद्यकीय क्षेत्रात मानाचा ठसा!

डॉ. स्नेहल शिवाजी पाटील यांचा यशोदा सौहार्द सोसायटीत सत्कार



कुद्रेमानी : प्रतिनिधी

कुद्रेमानी गावची कन्या स्नेहल शिवाजी पाटील हिने बेळगाव येथील भरतेश होमिओपॅथिक कॉलेजमधून बीएचएमएस (BHMS) ही वैद्यकीय पदवी संपादन केल्याबद्दल यशोदा सौहार्द सहकारी सोसायटी, कुद्रेमानी येथे तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कौटुंबिक स्वरूपाच्या सत्कार सोहळ्यात डॉ. स्नेहल हिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



डॉ. स्नेहल ही दौलत साखर कारखान्याचे अधिकारी तसेच सौदार्य सहकारी सोसायटी, कुद्रेमानीचे संस्थापक व चेअरमन शिवाजी निंगाप्पा पाटील यांची कन्या आहे. तसेच विलास निंगाप्पा पाटील, दीपक निंगाप्पा पाटील आणि निवृत्त सैनिक संभाजी निंगाप्पा पाटील यांची ती पुतणी आहे.


यावेळी मार्गदर्शन करताना रवींद्र पाटील सर म्हणाले, “ग्रामीण भागातील मुलीने वैद्यकीय क्षेत्रात यश संपादन करून डॉक्टर होणे ही अभिमानाची बाब आहे. डॉ. स्नेहल हिने आपल्या कर्तृत्वाने पाटील कुटुंबाचा मान उंचावला असून गावाचाही सन्मान वाढविला आहे. तिने ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून रुग्णांची प्रामाणिकपणे व सेवाभावी वृत्तीने सेवा करावी आणि आपल्या कार्यातून कुटुंबाचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.



याप्रसंगी माणिक गोवेकर सर आणि रवींद्र पाटील सर यांच्या हस्ते डॉ. स्नेहल हिचा सत्कार करण्यात आला. तसेच निलेश शंकर पाटील, अमृत कृष्णा पाटील, वैजू गुंडू पन्हाळकर आणि जोतिबा पाटील यांनीही तिचा सत्कार करून अभिनंदन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन करून माणिक गोवेकर सर यांनी शुभेच्छा  दिल्या.


ग्रामीण भागातील कन्येने वैद्यकीय शिक्षणात मिळविलेले हे यश गावातील इतर मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरणारे असून डॉ. स्नेहल पाटील हिच्या पुढील वैद्यकीय सेवेसाठी सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments