तुर्केवाडी येथे एम.ए. शिक्षणशास्त्र व शालेय व्यवस्थापन पदविका प्रथम वर्षाचा उद्घाटन व स्वागत सोहळा उत्साहात संपन्न!
तुर्केवाडी, दि. १० ऑक्टोबर : दि महाराष्ट्र एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अकॅडमी, चंदगड संचलित महादेवराव वांद्रे बी.एड. कॉलेज, तुर्केवाडी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या एम.ए. शिक्षणशास्त्र (M-83) व शालेय व्यवस्थापन पदविका (P10) या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचा उद्घाटन व स्वागत सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात २८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. खाडे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका मृणालिनी महादेवराव वांद्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मोहन परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यापिठ गीत शैला कांबळे यांनी सादर केले .
यावेळी संस्थापक-अध्यक्ष डॉ. महादेवराव वांद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उच्च शिक्षणाचे महत्त्व, शैक्षणिक क्षेत्रातील बदल आणि शिक्षकांनी काळानुरूप स्वतःमध्ये ज्ञान व कौशल्यांची भर घालण्याची आवश्यकता याविषयी विचार मांडले. शिक्षण क्षेत्रात कार्य करताना गुणवत्ता, शिस्त, समर्पण आणि विद्यार्थिकेंद्रित दृष्टिकोन यांना महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. एस. जी. खाडे यांनी एम.ए. शिक्षणशास्त्र आणि शालेय व्यवस्थापन पदविका या अभ्यासक्रमांचे महत्त्व विशद केले. शिक्षणव्यवस्थेतील बदल, प्रभावी शालेय व्यवस्थापन, शैक्षणिक नेतृत्व, संशोधनवृत्ती आणि अध्यापनातील नावीन्य यांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक क्षमतेचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सीमाकवी रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्मितीचा भक्कम पाया असल्याचे सांगितले. माहितीचे ज्ञानात, ज्ञानाचे प्रज्ञेत आणि प्रज्ञेचे कृतीत रूपांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने अध्ययन, चिंतन व मनन केले पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत शिक्षकांनी अद्ययावत ज्ञान आत्मसात करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रा. ग. गो. प्रधान यांनी शैक्षणिक क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संधी, अभ्यासक्रमाचे स्वरूप आणि ज्ञानवृद्धीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. केंद्र संयोजक प्रा. एन. जे. कांबळे यांनी अभ्यासक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग यांद्वारे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करावा, असे सांगून सर्वांचे आभार मानले .
प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या २८ विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या अभ्यासक्रमांमुळे शिक्षण क्षेत्रातील ज्ञान, शैक्षणिक व्यवस्थापनाची समज आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा कांबळे यांनी केले. मान्यवर, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत उद्घाटन व स्वागत सोहळा उत्साहात पार पडला.





Post a Comment
0 Comments