Type Here to Get Search Results !

शिक्षकांनी सर्जनशील विचार पेरावेत - गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील

 शिक्षकांनी सर्जनशील विचार पेरावेत - गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील


हलकर्णी, ता. चंदगड: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), कोल्हापूर आणि शिक्षण विभाग, पंचायत समिती चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवनियुक्त शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी येथे ११ नोव्हेंबर २०२४ रोजी झाली. ४ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या या सातदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षकांना विविध तांत्रिक व शैक्षणिक कौशल्ये शिकवण्यात आली.

कार्यक्रमाच्या सांगता समारंभात गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "प्राथमिक शिक्षकांनी सर्जनशीलतेचा अंगीकार करून विद्यार्थ्यांमध्ये नवीन विचारांची पेरणी करावी. प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असावा. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांनी सोप्या व सर्जनशील पद्धतींचा वापर करावा. विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श शिक्षक होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, शिस्तबद्धता आणि निष्ठेने कार्य करणे आवश्यक आहे."

प्रशिक्षणाच्या सांगता सोहळ्यात प्रशिक्षित शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. योगेश पाटील, स्नेहल पाटील, आदित्य बारब्दे, विजू चौरे, परशराम पवार, सोमीनाथ डोंगरे, अभिषेक तेली यांनी आपल्या प्रशिक्षण अनुभवाबद्दल सांगून भविष्यात उत्कृष्ट शिक्षक होण्याची प्रतिज्ञा केली.


या प्रशिक्षणामध्ये सुलभक म्हणून संजय साबळे, रविंद्र पाटील, महादेव साळवे, विश्वास पाटील आणि अर्चना रेळेकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी शिक्षकांच्या विविध शंका निरसन करून प्रशिक्षण अधिक प्रभावी केले.

समारंभात उपप्राचार्य आर. बी. गावडे, विस्तार अधिकारी सुमन सुभेदार, केंद्रप्रमुख प्रशांत जगताप, प्रशिक्षण समन्वयक सुनिल पाटील, भाऊ देसाई, स्वाती चौगुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता गावडे यांनी तर आभार प्रदर्शन नामदेव पाटील यांनी केले.

या प्रशिक्षणाने नवनियुक्त शिक्षकांना आधुनिक शिक्षण पद्धती, तंत्रज्ञानाचा वापर, शैक्षणिक उपक्रम, सर्जनशीलता आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची कौशल्ये शिकण्याची संधी दिली.


Post a Comment

0 Comments