Type Here to Get Search Results !

"दौलतचा कारभार समर्थपणे हाताळत आहे, कुणी काळजी करू नये." - मानसिंग खोराटे

"दौलतचा कारभार समर्थपणे हाताळत आहे, कुणी काळजी करू नये." - मानसिंग खोराटे

हलकर्णी कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया

अजितदादा 'दौलत'ची काळजी तुम्ही करू नका, मी सक्षम


चंदगड : “विधानसभा निवडणुकीत मिळणाऱ्या जनसमर्थनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राजेश पाटील यांना धसका बसला आहे,” असे प्रतिपादन अथर्व-दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी हलकर्णी येथे पत्रकार परिषदेत केले. अजित पवार यांनी नेसरी येथील सभेत केलेल्या आरोपांना त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

"दौलतचा कारभार समर्थपणे हाताळत आहे, कुणी काळजी करू नये."

खोराटे म्हणाले, "अजितदादांना साखर उद्योगाचे सखोल ज्ञान असले तरीही दौलतच्या रिकव्हरीबाबत प्रश्न उपस्थित करणे दुर्दैवी आहे. आमच्या कारखान्यात बीहेव्ही मोलॅसिसपासून अल्कोहोल निर्मिती केली जाते, ज्यामध्ये थोड्या प्रमाणात साखर मिसळावी लागते. त्यामुळे रिकव्हरी कमी येते. तरीही आम्ही शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक दर देत आलो आहोत. दौलतच्या कामगिरीबाबत शंका उपस्थित करण्याऐवजी २०१० साली कारखाना बंद असताना तुम्ही कुठे होतात?"

खोराटे यांनी पुढे विचारले, "आज कारखाना सुरळीत सुरू आहे, शेतकरी, वाहतूकदार आणि कामगार समाधानी आहेत. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना पोटशूळ होत आहे. त्यांना आता अचानक कारखान्याची आठवण झाली आहे. कारखान्याची काळजी करण्याची गरज नाही, मी तो समर्थपणे चालवतो आहे."

"जनताच योग्य उत्तर देईल" - संतोष मळविकर 

अँड. संतोष मळविकर यांनी या वेळी "राजेश पाटील यांची सत्तेची भूक वाढत आहे. दौलत काबीज करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण सभासद, शेतकरी आणि कामगार हे खपवून घेणार नाहीत. या निवडणुकीत जनता त्यांना योग्य जागा दाखवेल," असा इशारा दिला.

"अजितदादांनी राजकीय हेतू उघड केला."

"दौलत साखर कारखान्याला राजकारणात ओढले जाऊ नये," असे खोराटे यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी पुढे म्हटले, "पूर्वी आमदारांनी गाळप परवाना रद्द करण्याचे पत्र दिल्याचे पुरावे असून, त्यामागे अजित पवार यांचा हात असल्याचे जवळपास स्पष्ट होते. अजितदादांनी किंवा त्यांना सल्ला देणाऱ्यांनी विचारपूर्वक आरोप करावेत. आम्ही सरळमार्गी आहोत आणि कारखाना उत्तम प्रकारे चालवत आहोत."

या पत्रकार परिषदेत बी. एम. पाटील, राजवर्धन शिंदे, भरमू जाधव, शावेर फर्नांडिस आणि बाबूराव पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

"दौलत कारखान्याचा विकास शेतकऱ्यांच्या हितासाठीच असेल," असे खोराटे यांनी ठामपणे सांगत सभा समाप्त केली.


Post a Comment

0 Comments