Type Here to Get Search Results !

'दीपसंदेश' दिवाळी अंकाचे प्रकाशन

 साहित्य-संस्कृतीमुळे समाजात परिवर्तन, देशाच्या घडणीसाठी लेखकांनी योगदान द्यावे - ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील

मराठी भाषेला अभिजात दर्जा, आता ती ज्ञानभाषा व्हावी - अनिल आजगावकर


मराठी भाषेचे स्थान साहित्य-संस्कृतीत मोठे आहे, ती समाजाला घडवते आणि देशाच्या विकासाला चालना देते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केले. ते अखिल भारतीय साहित्य परिषद बेळगाव आणि संदेश न्यूज बेळगावतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने दीप संदेश दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

गुणवंत पाटील यांनी आपल्या भाषणात लेखकाने समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न मांडावेत आणि त्यावर समाधानकारक उपाय शोधण्याचे कार्य करावे, असे सांगितले. "लेखनातूनच समाजाचे दुःख आणि वेदना प्रभावीपणे मांडल्या जातील. त्यामुळे समाज वाचनाच्या माध्यमातून अधिक प्रगल्भ होईल," असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक आणि स्तंभलेखक अनिल आजगावकर यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे कौतुक करताना तिला ज्ञानभाषा बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. "मराठी भाषेचा वापर शिक्षणात, आर्थिक व्यवहारात आणि दैनंदिन व्यवहारात झाला पाहिजे. शिवरायांच्या काळात मराठीचा वापर राज्यकारभारात झाला, आता सरकारने प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण मराठीतून दिले पाहिजे," असे त्यांनी आवाहन केले.

दीप संदेश दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित या विशेष कार्यक्रमात, व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राजाध्यक्ष रवींद्र पाटील, अध्यक्ष सुधीर चव्हाण, शिवसंत संजय मोरे, डी. बी. पाटील, कवी निळूभाऊ नार्वेकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमात डी. बी. पाटील, अनुजा मिठारे, आणि जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते संजय गौंदाडकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ कवी निळूभाऊ नार्वेकर, कवयित्री अस्मिता आळतेकर आणि स्मिता किल्लेकर यांनी आपल्या सुमधुर कवितांनी कार्यक्रमात रंग भरला.

दीप संदेश दिवाळी अंकाच्या संपादिका अरुणा गोजे पाटील यांनी अंकाचे महत्त्व विषद केले, तर सूत्रसंचालन रोशनी हुंदरे आणि मनीषा नाडगोडा यांनी केले. रणजीत चौगुले यांनी आभारप्रदर्शन केले. उपस्थितांमध्ये कवी चंद्रशेखर गायकवाड, एम. के. पाटील, लेखक बजरंग धामणेकर आणि अन्य साहित्यिक मंडळी होती.


Post a Comment

0 Comments