राजर्षी शाहू समविचारी आघाडीचा उमेदवार विजयी होणार – विनायक उर्फ अप्पी पाटील
चंदगड विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीत राजर्षी शाहू समविचारी आघाडीचा उमेदवार विजयी होईल आणि महाविकास आघाडीला बळकट करत महायुतीचा पराभव निश्चित करेल, असा विश्वास आघाडीचे उमेदवार विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी व्यक्त केला.
"ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यासाठीची नसून विचारांची लढाई आहे. आम्ही मतदारसंघाचा मूलभूत विकास आणि धर्माध व जातीयवादी प्रवृत्तींचा पराभव हे उद्दिष्ट ठेऊन मैदानात उतरलो आहोत," असे ते म्हणाले. त्यांनी महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांच्यावर जनतेचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला आणि जनतेच्या समर्थनाने त्यांचा पराभव करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
संपन्नता आणि समस्यांचा मेळ
चंदगड मतदारसंघ नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असूनही ६०% जमिनी सिंचनाखाली नाहीत. हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या नद्यांसह अनेक सिंचन प्रकल्प अस्तित्वात असतानाही पाण्याची कमतरता आहे. “या भागासाठी बंद पाईपद्वारे पाणीपुरवठा करून वंचित क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे पाटील यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक पर्यटन आणि रोजगार विकास
या परिसरात पर्यावरणाचा समतोल राखून पर्यटन व्यवसायाचा विकास केला जाईल, ज्यामुळे स्थानिक तरुणाईसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. शेती उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणीस प्राधान्य दिले जाईल.
आरोग्य आणि शिक्षणावर विशेष लक्ष
“सरकारी आरोग्यसेवा सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू आणि गरज पडल्यास जनआंदोलन उभे करू,” असे पाटील यांनी ठामपणे सांगितले.
सक्षम नेतृत्वाचा विश्वास
आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातील जनता राजर्षी शाहू समविचारी आघाडीसोबत असल्याचा दावा करत त्यांनी मतदारांना सक्षम नेतृत्वाचा पर्याय दिल्याचे सांगितले.
"महायुती म्हणजे धर्माध विचारसरणीचा प्रतीक, तर महाविकास आघाडीने जनतेचा विश्वास गमावला आहे. अशा वेळी, राजर्षी शाहू समविचारी आघाडी हा विकासासाठीचा खरा पर्याय आहे," असे म्हणत त्यांनी जनतेला विचाराधारित बदलासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
लोकाभिमुख विकासासाठी ठाम अजेंडा
मतदारसंघातील पायाभूत सुविधा, सिंचन, आरोग्य, शिक्षण आणि शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवत पाटील यांनी राजर्षी शाहू समविचारी आघाडीचा अजेंडा स्पष्ट केला. “ही निवडणूका विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठीची आहे,” असे ते म्हणाले.
या विधानांनी मतदारसंघात चर्चेला उधाण आले असून, आगामी निवडणुकीत राजर्षी शाहू समविचारी आघाडीचा प्रभाव निर्णायक ठरणार आहे, हे स्पष्ट होत आहे.

Post a Comment
0 Comments