आशा पत्रावळी यांना “नारीशक्ती – २०२५” पुरस्काराने सन्मान
मा. राजेश चौगुले फाउंडेशन, अंकलखोप तर्फे आयोजित भव्य सोहळ्यात गौरव
अंकलखोप | मा. राजेश चौगुले फाउंडेशन या सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नुकताच “नारीशक्ती – २०२५” हा भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सौ. आशा पत्रावळी यांना त्यांच्या बहुआयामी कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
स्त्रीच्या जिद्द, संघर्ष, प्रेम, त्याग आणि निस्वार्थ सेवेचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमात, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. सौ. पत्रावळी यांनी साहित्य, लेखन, शिक्षण, कला, समाजसेवा आणि महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नावावर आजवर १६६ हून अधिक पुरस्कार असून, बुक ऑफ रेकॉर्ड्समधील विशेष मान्यता, राज्यस्तरीय शिक्षण व उद्योग पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय महिला सन्मान यांचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली सहा पुस्तके समाजप्रबोधनासाठी उपयोगी ठरली आहेत.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. माधुरी पाटील (प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, कोल्हापूर), सौ. सारिका कासोटे (गटशिक्षणाधिकारी, करवीर), सौ. जयश्री जाधव (विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग), सौ. अर्चना मुळे (कौन्सलर, सांगली), आणि सौ. पूनम माने (सहायक पोलीस निरीक्षक, इस्लामपूर) उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शीतल राजेश चौगुले होत्या.
या कार्यक्रमात मान्यवरांनी महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक योगदानाचे कौतुक केले. ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या कार्यास मंच मिळवून देणारा आणि त्यांच्यातील प्रेरणा जागवणारा असा हा सोहळा ठरला.
सौ. आशा पत्रावळी यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले, "हा सन्मान मला नव्या जोमाने कार्य करण्यास प्रेरणा देणारा आहे. या यशामागे माझ्या कुटुंबाचे, गुरूजनांचे आणि समाजातील प्रत्येक स्त्रीचे पाठबळ आहे."
त्यांच्या या गौरवाबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments