Type Here to Get Search Results !

सेन्ट्रल हायस्कूल, बेळगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक मेळावा संपन्न

 मराठा मंडळ सेन्ट्रल हायस्कूल, बेळगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पालक मेळावा उत्साहात संपन्न


बेळगाव ( शिवसंदेश न्यूज ) :मराठा मंडळ सेन्ट्रल हायस्कूल, बेळगाव येथे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा नुकताच शाळेच्या भातकांडे सभागृहात उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. एम. पाटील सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. ऋतुराज प्रकाश चौगुले व त्यांच्या पत्नी श्रद्धा चौगुले उपस्थित होते. तसेच पालक प्रतिनिधी परशराम पालकर, उज्वला माळवी, ज्येष्ठ शिक्षक डी. टी. सावंत व पी. बी. मस्तीहोळी हे मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक  डी. टी. सावंत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्री. एम. के. पाटील यांनी करून दिला.

प्रमुख पाहुणे डॉ. ऋतुराज चौगुले यांनी पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत गोडी निर्माण करून वेळेचे नियोजन शिकवणे ही पालकांची मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या शंका शिक्षकांच्या सहाय्याने दूर करून संवादातून त्यांच्या प्रगतीचा मार्ग शोधावा."


पालक प्रतिनिधी परशराम पालकर यांनी ‘स्मार्ट गुरुजी’ या अ‍ॅपचा उल्लेख करत पालकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षकांच्या मदतीने अभ्यासातील अडचणी दूर कराव्यात, असे मनोगत व्यक्त केले.

डॉक्टर ऋतुराज चौगुले व श्रद्धा चौगुले यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक बी एम पाटील सर पालक प्रतिनिधी परशराम पालकर यांनी केला . यावेळी डॉ. चौगुले यांनी संस्थेचे नांव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा दिल्या .


कार्यक्रमात शिक्षकांचे प्रतिनिधित्व करताना डी. टी. सावंत व पी. बी. मस्तीहोळी यांनी, तर पालक प्रतिनिधी म्हणून प्रवीण शिरोडकर, मोहन भैरटकर व बाळकृष्ण मोदेकर यांनी सहभाग घेत शंका-समाधान सत्रात मोलाची भूमिका बजावली.


अध्यक्षीय समारोपात बोलताना मुख्याध्यापक बी. एम. पाटील म्हणाले, "विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करणे, पालकांचा सन्मान राखणे आणि कठोर परिश्रमातून सर्वांगीण प्रगती साधणे, हीच यशाची गुरुकिल्ली आहे."


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही. राक्षे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन वृषाली नंदीहळळी मॅडम यांनी केले.

Post a Comment

0 Comments