राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा
![]() |
| अध्यक्ष प्रतापराव सुर्यवंशी मार्गदर्शन करताना |
शिनोळी बु. (ता. चंदगड) | 16 जून 2025
ज्ञानदिप शिक्षण मंडळ शिनोळी संचालित राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या प्रारंभानिमित्त 'शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत' सोहळा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रतापराव सूर्यवंशी हे होते.
"शाळा ही केवळ इमारत नाही, ती एक संस्कारसंस्था आहे — जी विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानच नाही, तर शिस्त, जबाबदारी, नेतृत्व, सौहार्द, देशभक्ती आणि मूल्यांचा खजिना देते." असे प्रतिपादन प्रतापराव सुर्यवंशी यांनी केले . यावेळी नवागत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा भरली.
![]() |
| विद्यार्थांना खाऊ वाटप करताना |
यावेळी इयत्ता ८ वीमध्ये दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचे अध्यक्षांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच गोड पदार्थ 'लाडू' वाटून स्वागताचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सचिव बी.डी. तुडयेकर यांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या .मुख्याध्यापक मा. एन. टी. भाटे सर यांनी आपल्या मनोगतातून नवख्या विद्यार्थ्यांना शाळेच्या गौरवशाली परंपरेची ओळख करून दिली व नियमित उपस्थिती, अभ्यास आणि सृजनशीलतेचे महत्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. जे. पाटील सर यांनी केले.
या प्रसंगी शाळेचे शिक्षक एस. बी. कदम, विक्रम तुडयेकर, तानाजी पाटील, तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी पिराजी सुतार , वाय.आय. भाटे , ज्ञानेश्वर सुतार व अरुण सूर्यवंशी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात नव्या शैक्षणिक वर्षाची उमेद जागवली आणि राजर्षी शाहू विद्यालयाच्या अभ्यासू, संस्कारी वातावरणाचे सजीव दर्शन घडवले.


Post a Comment
0 Comments