Type Here to Get Search Results !

पी. एन. यळ्ळूरकर सरांचा सेवापूर्ती सपत्नीक सत्कार सोहळा थाटात पार

 


सेवानिवृत्तीतून कृतज्ञतेकडे…

पी. एन. यळ्ळूरकर सरांचा सपत्नीक सत्कार सोहळा थाटात पार

तुर्केवाडी ( रवी पाटील) –
जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय तुर्केवाडी या शिक्षण क्षेत्रातील मान्यवर संस्थेचे मुख्याध्यापक मा. पी. एन. यळ्ळूरकर सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार सोहळा उत्साहात आणि भावुक वातावरणात पार पडला. शिक्षक म्हणून ३२ वर्षांची अत्युच्च शैक्षणिक सेवा पूर्ण करून त्यांनी अध्यापन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. आर. एन. पाटील होते, तर स्वागताध्यक्ष सचिव जी. एन. पाटील यांनी स्वागतपर मनोगत सादर केले.


या सोहळ्याचे प्रमुख वक्ते डॉ. कवी चंद्रकांत पोतदार सर यांनी "ज्ञान, शिक्षण आणि संस्कार" या त्रिसूत्रीचा सुंदर ऊहापोह करताना म्हटले,

"शिक्षकाची खरी कमाई ही विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत वाचन दिसण्यात असते. वाचन हेच जगणं समृद्ध करतं. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर आयुष्याला अर्थ देणारा प्रवास आहे. पी. एन. यळ्ळूरकर सर हे मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा देणारे शिक्षक होते."

 सत्कार स्वीकारताना मुख्याध्यापक पी. एन. यळ्ळूरकर सर भावविवश झाले. त्यांनी अत्यंत कृतज्ञतेने आपल्या शाळेचा, संस्थेचा, सहकारी शिक्षकवर्गाचा आणि विद्यार्थ्यांचा उल्लेख करत भावनिक उद्गार व्यक्त केले –

"शाळा म्हणजे माझं दुसरं घर, आणि विद्यार्थ्यांचा विश्वास हीच माझी शिदोरी होती. ही तीन दशकांची वाटचाल सहज नव्हती, पण सहकार्य, प्रेम आणि आपुलकीमुळेच ती समृद्ध झाली. मी या सर्वांचा ऋणी आहे."

या वेळी मनोगतपर भाषणे बी. बी. पाटील (सुळगा), पी. एम. ओऊळकर सर, मुख्याध्यापक फगरे सर, शंकर ओऊळकर, सचिव मुख्याध्यापक मोहनगेकर सर, पी. एन. पाटील यांनी दिली. त्यामध्ये सरांच्या विनोदी, मनमिळावू आणि शिक्षणप्रिय स्वभावाच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमास पिनू पाटील, प्रकाश पवार ,संस्थेचे सदस्य राजू बोलके,गोविंद हलकर्णीकर ,अनिल गावडे,ग्रामपंचायतीचे सदस्य, मुख्याध्यापक गुलाब पाटील , मुख्याध्यापक एन टी भाटे , विविध शाळांचे मुख्याध्यापक, अध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक बी. एन. पाटील सर यांनी तर सूत्रसंचालनाची धुरा एम. के. पाटील सर यांनी नेटकेपणाने पार पाडली. तर आभार पर्यवेक्षक एस . ए .पाटील यांनी आभार मानले .

या कार्यक्रमात एकीकडे श्रद्धेचा, प्रेमाचा आणि स्नेहाचा ओलावा होता; तर दुसरीकडे एका आदर्श शिक्षकाला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात पाणी होतं. यळ्ळूरकर सरांचं कार्य हे नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्रोत ठरलं आहे.

– प्रतिनिधी

Post a Comment

0 Comments