कन्नड सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आक्रमक : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन सादर
बेळगाव | प्रतिनिधी : कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर सध्या चर्चेचे वळण घेणाऱ्या कन्नड सक्तीविरोधात आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने ठोस पावले उचलण्यात आली. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन सादर करून कन्नड सक्ती थांबविण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी गेल्या काही दिवसांपासून सीमाभागात मराठी भाषिकांवर होत असलेल्या कन्नड सक्तीच्या घटनांचा उल्लेख करत शासनाच्या कन्नड प्राधिकरण बैठकीतील निर्णयांपासून ते गणेशोत्सवाच्या फलकांपर्यंत अनेक बाबींचा ऊहापोह केला. त्यांनी सांगितले की, या घटनांमधून मराठी भाषिक अल्पसंख्यांकांचे मूलभूत अधिकार व संविधानिक अधिकार पायदळी तुडवले जात आहेत, ही गंभीर बाब आहे.
शेळके पुढे म्हणाले, "तुम्ही आम्हाला विरोधक समजत असाल किंवा राजकीय हेतू शोधत असाल, तरीही हे लक्षात ठेवा की सध्या तुम्ही आमचे आमदार आहात. मराठी भाषिक मतदारांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना न्याय मिळवून देणं, हा तुमचा कर्तव्य आहे."
या निवेदनावर उत्तर देताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी "कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आवश्यक ती पावले उचलू. संविधानाची पायमल्ली कोठेही होऊ देणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल," असे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात प्रा. डॉ. अच्युत माने, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, निपाणी अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, समिती नेते शिवाजी हावळाण्णा, महादेव पाटील, सचिन गोरले (शिवसेना तालुकाप्रमुख), पिराजी मुंचडीकर, अशोक घगवे, चंद्रकांत पाटील, नारायण मुंचडीकर, विजय जाधव, रमेश माळवी, अभिजित मजुकर, सागर कणबरकर, अश्वजित चौधरी, सुनिल किरळे, अमर विठे, तात्यासाहेब कांबळे, राजकुमार मेस्त्री, सतिष पाटील, किरण मोदगेकर, सुरज जाधव, अभिजित कारेकर, अशोक डोळेकर, किसन सुंठकर, भागोजीराव पाटील, के.एम.कोल्हे, राजकुमार बोकडे, सागर सागावकर, यल्लाप्पा पाटील, बाबु पावशे, निलेश काकतकर, विनायक मजुकर, शिवम जाधव, जोतिबा येळ्ळूरकर, सागर कडेमनी, आकाश कडेमनी, रमेश मोदगेकर, शामराव पाटील, मधू मोदगेकर, सचिन मोदगेकर, प्रकाश पाटील, चंद्रकांत मोदगेकर, गजानन शहापूर, मोतेश बारदेशकर, शंकर कोणेरी, निरंजन जाधव, सुधीर शिरोळे, विनायक पवार, परशराय बसरीकट्टी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठी अस्मितेसाठी लढा देणाऱ्या युवा समितीने पुन्हा एकदा सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवत एक मजबूत भूमिका घेतली आहे.

Post a Comment
0 Comments