Type Here to Get Search Results !

चंदगड मतदार संघात शाहू जयंतीनिमित्त ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कोल्हापूरकर सेवा संस्थेचा उल्लेखनीय उपक्रम : शाहू जयंतीनिमित्त ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांची प्रेरणा


शैक्षणिक साहित्य वाटप 

चंदगड (प्रतिनिधी)

कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था, नवी मुंबई व अंकुश सोनावणे मित्र मंडळ, ऐरोली – नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व चंदगडचे लोकप्रिय आमदार मा. शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या प्रेरणेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये ३० जून ते ३ जुलै २०२५ दरम्यान शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय पिशव्या, वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसामग्री पोहोचवून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस हातभार लावण्याचा स्तुत्य प्रयत्न संस्थेने केला.


कार्यक्रमाची सुरुवात चंदगड तालुक्यातील सुळये येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली. येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करत प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी चंदगडचे तहसीलदार मा. राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री. विश्वास पाटील, शिक्षणाधिकारी श्री. वैभव पाटील, नवी मुंबई महापालिकेचे माजी सदस्य श्री. अंकुश सोनवणे, तसेच कोल्हापूरकर सेवा संस्थेचे पदाधिकारी – अध्यक्ष डी. एल. भादवणकर, सचिव प्रकाश तेजम, खजिनदार रणधीर पाटील, कार्याध्यक्ष विशाल पाटील, उपाध्यक्ष मारुती अर्दाळकर, सल्लागार मनोहर पाटील, उपखजिनदार अभिजीत पुजारी, सदस्य योगेश मुळे, उत्तम भादवणकर, विजय सुर्वे, सागर शेळके, शुभम भादवणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाला संबंधित गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग, तसेच ग्रामस्थ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांचे समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

संस्थेचे कार्य केवळ शैक्षणिक साहित्य वाटपापुरते मर्यादित नसून शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकास या तीन क्षेत्रांमध्ये संस्थेचे कार्य सातत्याने सुरू आहे. ग्रामीण भागातील गरजूंसाठी आपल्या मुळाशी नाळ जपत, मुंबईसारख्या महानगरातून समाजासाठी काहीतरी करण्याचा आदर्श या उपक्रमातून संस्थेने उभा केला आहे.

या यशस्वी उपक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्यावतीने मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.



Post a Comment

0 Comments