Type Here to Get Search Results !

जिल्हास्तरिय काव्य गायन स्पर्धेत हर्षिता निकम अव्वल तर देवयानी पाटील उपविजेती

माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत पुरस्कृत चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ आयोजित

जिल्हास्तरिय काव्य गायन स्पर्धेत हर्षिता निकम अव्वल तर देवयानी पाटील उपविजेती



चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ आयोजित आणि माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत यांच्या पुढाकारातून नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय काव्यगायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. जिल्ह्यातील तब्बल १३३ विद्यार्थ्यांनी आपल्या गोड, सुरेल व प्रभावी आवाजातून कवितांचे सादरीकरण करत रसिकांची मने जिंकली. काव्यातील आशय, स्वरांची लय व भावनांनी भारावलेल्या सादरीकरणामुळे रसिकांच्या अंतःकरणाला भिडणारे क्षण अनुभवायला मिळाले.


या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. हर्षिता संग्राम निकम (प. बा. पाटील हायस्कूल, मुदाळ – भुदरगड) हिने कुसुमाग्रजांच्या “अनामवीरा” या कवितेच्या प्रभावी सादरीकरणाने पटकावला. द्वितीय क्रमांक कु. देवयानी तानाजी पाटील (राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बुद्रुक – चंदगड) हिने संत जनाबाईंचे “धरीला पंढरीचा चोर” सादर करून मिळवला. तर तृतीय क्रमांक कु. कीर्ती सदाशिव आवटे (राजर्षी शाहू हायस्कूल, कोल्हापूर) हिने संत तुकडोजी महाराजांची “या झोपडीत माझ्या” ही कविता गाऊन पटकावला.


चतुर्थ क्रमांक कु. जानवी निवास पाटील (वि. स. खांडेकर प्रशाला, कोल्हापूर – “गर्जा महाराष्ट्र माझा” राजा बढे) व पाचवा क्रमांक कु. पुर्वा श्रीकांत वाघे (हेरवाड हायस्कूल, शिरोळ – “वनवासी” तुकाराम धांडे) यांनी मिळवला.


याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिके कु. स्वराली राजेंद्र जोंगे (तुरुकवाडी), कु. श्रेणिक सर्जेराव सुतार (वाशी, करवीर), कु. सिद्धीका मुजीबूर रेहमान मुल्लानी (पट्टणकोडोली, हातकणंगले) व कु. आराध्या संदीप मोरे (जरगनगर, कोल्हापूर) यांना जाहीर करण्यात आली.


या स्पर्धांमध्ये जिल्हातील सर्व तालुक्यातून इयता ५ ते १० वी विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते. चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचा अभिनव उपक्रमाला जिल्हातून उदंड प्रतिसाद मिळाला . बक्षिस वितरण तारीख लवकरच संयोजक जाहीर करणार आहेत.


विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील भावस्पर्शी ताकदीमुळे ही स्पर्धा केवळ जिल्हास्तरीय न राहता शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी उपक्रम ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून जोरदार अभिनंदन होत आहे.

Post a Comment

1 Comments
  1. अभिनव उपक्रम
    आयोजकांच्या संकल्पनेला वंदन

    ReplyDelete
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.