कन्नड सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आक्रमक – आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी):
कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर लादली जाणारी कन्नड सक्ती त्वरीत थांबवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या शिष्टमंडळाने खानापूरचे आमदार मा. विठ्ठल हलगेकर यांची नुकतीच भेट घेतली आणि ठोस कार्यवाहीसाठी निवेदन सादर केले.
या वेळी समितीचे पदाधिकारी शुभम शेळके यांनी सार्वजनिक कार्यक्रमात मराठी भाषिकांवर लादल्या जाणाऱ्या कन्नड सक्तीविरोधात आपली भूमिका स्पष्ट करत आमदार हलगेकर यांना तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले. "आपण स्वतः मराठी भाषिक आहात, त्यामुळे या अन्यायकारक निर्णयामुळे आपणासही मनस्ताप होतोय," असे सांगत त्यांनी हा मुद्दा गांभीर्याने घ्यावा, अशी विनंती केली.
कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी यापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनाची आठवण करून दिली. त्यांनी खानापूर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्थानक, इस्पितळ आणि हेस्कॉम कार्यालयांवर मराठी भाषेतील फलक न लावल्याचा मुद्दा उपस्थित केला. "मराठी भाषिक अल्पसंख्याकांना घटनात्मक हक्क आहेत. हा विषय मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांच्या कानावर आपणच घालावा," असे त्यांनी नमूद केले.
या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी म्हटले, “मी स्वतः मराठी भाषिक मतदारांच्या पाठिंब्यावर निवडून आलो आहे. कन्नड सक्ती थांबवणे आवश्यक आहे, याबाबत मी पूर्णपणे सहमत आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती करतो.”
या प्रसंगी सरचिटणीस मनोहर हुंदरे, धनंजय पाटील, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, पिराजी मुंचडीकर, चंद्रकांत पाटील, नारायण मुंचडीकर, रमेश माळवी, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले, जोतिबा येळ्ळूरकर, अशोक डोळेकर, प्रतिक गुरव, सचिन दळवी, अशोक घगवे, महेंद्र जाधव, सुरुज जाधव, राजू पाटील, साईराज कुगजी, ज्ञानेश्वर चिकोर्डे, प्रशांत बैलूरकर आदींसह मोठ्या संख्येने मराठी भाषिक उपस्थित होते.
मराठीचा अस्मिता जपण्यासाठी सीमाभागातील तरुण आता आक्रमक भूमिका घेत असल्याचे या आंदोलनातून स्पष्ट होत आहे.

Post a Comment
0 Comments