सीमाभागातील मराठींवर अन्याय : युवा समितीचे शिष्टमंडळ तज्ञ समितीसमोर आक्रोशित"
बेळगाव (प्रतिनिधी) – सीमाकक्षात आयोजित तज्ञ समितीच्या बैठकीत युवा समितीच्या शिष्टमंडळाने सीमाभागातील मराठींवर होत असलेल्या अन्यायाबाबत सविस्तर माहिती देऊन प्रशासनाच्या कारभाराचा समाचार घेतला.
सत्तर वर्षांपासून मराठी भाषिकांवर कर्नाटकी सरकारकडून होत असलेल्या भाषिक दडपशाहीचे ताजे उदाहरण म्हणजे परवाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत “जय जय महाराष्ट्र” गीत वाजवल्याबद्दल दहा कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे. याशिवाय, महानगरपालिकेत मराठीची मागणी केल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांचे सभासदत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणी बेळगावात निदर्शने करणाऱ्या शिवभक्तांवर गुन्हे दाखल करून त्यांना चाळीस दिवस तुरुंगात टाकण्यात आले. एवढेच नव्हे तर, शिवभक्त युवकांना "हिस्टरी शीटर" म्हणून नोंदवून प्रत्येक सणासुदीला गुन्हेगाराप्रमाणे नोटिसा बजावल्या जात आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते व सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना हद्दपारीची नोटीस बजावून आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डिसेंबर 2022 मध्ये नेमलेली महाराष्ट्र-कर्नाटक समन्वय समिती आजतागायत निष्क्रिय असून, त्यामुळे भाषिक अन्याय वाढत चाललेला आहे, असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी होत असलेली बदनामी, कन्नड संघटनांचा दबाव, प्रशासनाचा एकतर्फी कारभार, तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमा प्रश्न तातडीने न्यायनिवाड्यासाठी पुढे न्यावा, अशी ठाम मागणी युवा समितीने केली.
या प्रसंगी अशोक घगवे, राजू पाटील, सूरज जाधव, साईराज कुगजी, दिगंबर खांबले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments