राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा विशेष मार्गदर्शन व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर, दि. ११ सप्टेंबर: स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, स्व:मूल्यांकन हे सगळे गुण अंगी असायला हवेत असे प्रतिपादन शाहूवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पवार यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या, समाजशास्त्र अधिविभाग मार्फत दि. ११ सप्टेंबर, २०२५ रोजी राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षांच्या पूर्वधर्तीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते. श्री. पवार यांनी सदर मार्गदर्शनपर व्याख्यानात विद्यार्थ्यांना राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा संदर्भात बोलतांना अनेक बाबींवर प्रकाश टाकला. त्यात विषयनिहाय अभ्यास, अभ्यासाचे धोरण, संदर्भ पुस्तके, परीक्षेचे स्वरूप, अभ्यास दरम्यान पाळावयाच्या सवयी व शिस्त यासोबतच प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठीच्या सोप्या युक्त्या त्यांनी सांगितल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एन. शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी विद्यार्थ्यानी परीक्षेची तयारी करत असतांना स्वत:शी प्रामाणिक तर राहिलेच पाहिजे शिवाय आई-वडील आणि शिक्षकांसोबतही प्रामाणिक राहण्याचा सल्ला दिला. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही, असेही ते म्हणाले.
समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रतिमा पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख डॉ. मयूरेश पाटील यांनी करून दिली. सुप्रिया वडर यांनी सूत्र संचालन तर आकाश ब्राम्हणे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. प्रल्हाद माने, यांच्यासह विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments