जांबरे 'स्वच्छ व सुंदर गाव ' योजनेत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम
चंदगड ( प्रतिनिधी ):
चंदगड तालुक्यातील जांबरे गावाने मेहनत, एकजूट आणि स्वच्छतेचा संकल्प यांचा संगम घडवत जिल्हाभरात मानाचा तुरा मिळवला आहे. आर. आर. (आबा) पाटील स्वच्छ व सुंदर गाव योजना 2023-24 मध्ये जांबरे ग्रामपंचायतीने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावत इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे.
हा पुरस्कार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यांच्या हस्ते जांबरे ग्रामपंचायती सरपंच विष्णू गावडे यांच्याकडे प्रदान करण्यात आला. यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला, तर गावकऱ्यांच्या डोळ्यांत अभिमानाश्रू दाटून आले.
या यशामागे “माझं गाव, माझी जबाबदारी” या भावनेने प्रत्येक कुटुंबाने केलेला सहभाग मोलाचा ठरला. कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, रस्त्यांची स्वच्छता, शाळा-गावसुंदर उपक्रम अशा विविध उपक्रमांनी जांबरे गाव जिल्ह्यात आदर्श बनले आहे. “हा सन्मान गावकऱ्यांचा आहे; जांबरे हे केवळ एक गाव नाही तर स्वच्छतेतून विकासाकडे जाण्याचा विचार आहे,” असे गौरवोद्गार सरपंच विष्णू गावडे यांनी यावेळी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव गावडे, बी.डी.ओ. वृक्षाली यादव, ग्राम विकास अधिकारी अश्विनी कुंभार, उपसरपंच रामकृष्ण गावडे, मुख्याध्यापक दीपक गोरे, पोलीस पाटील जानकू गावडे, माजी सरपंच प्राजक्ता गावडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे मिळालेला हा मानाचा पुरस्कार जांबरेच्या पुढील वाटचालीस नवसंजीवनी ठरणार आहे.


Post a Comment
0 Comments