‘सोबतीचे पुस्तक’ — कवयित्री रोशनी हुंद्रे यांच्या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन!
बेळगाव ( शिवसंदेश न्यूज ) "कविता ही समाजाचा आरसा आहे," या भावनेला साजेशी अशी ‘सोबतीचे पुस्तक’ ही कवयित्री रोशनी हुंद्रे यांची काव्यनिर्मिती नुकतीच प्रकाशीत झाली. बेळगाव येथील महिला विद्यालयात रविवारी (दि. २६) संपन्न झालेल्या या प्रकाशन समारंभात विचारमंचावर माजी प्राचार्य व विचारवंत कॉ. आनंद मेणसे, संपादक रमेश कोलवालकर (गोवा), कवी-दिग्दर्शक दर्शन लोलयेकर, कॉ. कृष्णा शहापूरकर, कवयित्री रोशनी हुंद्रे आणि रविराज हुंद्रे उपस्थित होते.
‘सोबतीचे पुस्तक’ – एक विचारमंथन, एक भावयात्रा, आणि काळाच्या नाडीला स्पर्श करणारी कवितासंगती!
प्रास्ताविक प्रतिभा सडेकर यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर कवयित्री हुंद्रे यांनी आपल्या काव्यप्रवासातील अनुभव मनोगतातून मांडले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे कॉ. आनंद मेणसे म्हणाले,
“देशातील ज्वलंत प्रश्नांवर कवयित्रीने संवेदनशील दृष्टिकोनातून भाष्य केले आहे. ‘सोबतीचे पुस्तक’ हे केवळ प्रेम किंवा निसर्गपुरते मर्यादित नसून, मणिपूर, देवदासी, किन्नर यांसारख्या समाजमनाला भिडणाऱ्या विषयांवरही प्रभावी कवितांद्वारे भाष्य करते. मराठी साहित्यविश्वात या संग्रहाचे स्वागत निश्चितच उत्स्फूर्तपणे होईल.”
एकूण ३० दर्जेदार कवितांचा हा संग्रह सामाजिक, मानवी आणि स्त्रीस्वाभिमानाच्या भावविश्वाला स्पर्श करणारा आहे.
![]() |
| अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तर्फे शुभेच्छा ! |
या प्रसंगी रविराज, स्वराज आणि रणवीर हुंद्रे यांच्यासह बाग परिवार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, प्रगतिशील लेखक संघ, तारांगण सदस्य, मैत्रेयी कलामंच तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यप्रेमी आणि काव्यरसिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. डॉ. मनीषा नाडगौडा यांनी मानले.


Post a Comment
0 Comments