“वक्तृत्वकलेचा मेळावा” — ‘खेडूत चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५’ मध्ये कारवे येथे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सचिव एम एम तुपारे बोलताना...
कारवे (प्रतिनिधी) :“वक्तृत्व ही विचारांना दिशा देणारी, आणि व्यक्तिमत्त्वाला उंच भरारी देणारी कला आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्री चे सचिव एम. एम. तुपारे यांनी केले. ते ‘खेडूत चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५’ च्या भव्य उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. उद्घाटनावेळी जेष्ठ संचालक शामराव मुरकुटे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. महात्मा फुले विद्यालय कारवे येथे दि .10 नोव्हेंबर रोजी स्पर्धा उत्साहात पार पडली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन. डी. देवळे होते.
या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये विचार मांडण्याची क्षमता विकसित करणे, आत्मविश्वास वृद्धिंगत करणे आणि वक्तृत्वकलेचा वारसा जोपासणे हा असल्याचे श्री. तुपारे यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, “विद्यार्थ्यांतील सुप्त प्रतिभेला व्यासपीठ मिळालं, की त्यातूनच भविष्याचे नेते, शिक्षक आणि विचारवंत घडतात.”
![]() |
| प्राचार्य एन.डी.देवळे शुभेच्छा देताना... |
ही स्पर्धा मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये घेण्यात आली. संस्थांतर्गत पार पडलेल्या या उपक्रमात एकूण १०३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध गटांतील वक्त्यांनी शिक्षण, पर्यावरण, तंत्रज्ञान, बेरोजगारी, स्त्री-सुरक्षा, ग्रामीण विकास अशा ज्वलंत विषयांवर विचार मांडून श्रोत्यांची दाद मिळवली.
परीक्षक मंडळात प्रा. एम. एम. गावडे, सतीश बोकडे, महादेव शिवणगेकर, रवि पाटील, बी. एन. पाटील, प्रा. तेलगोटे, एस. डी. सप्ताळे, के. डी. बारवेलकर आणि जयवंत पाटील यांनी अत्यंत बारकाईने न्यायनिवाडा केला.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, वकृत्वकौशल्य, आणि सामाजिक जाण यांचा अप्रतिम संगम सादर केला. त्यांच्या ओघवत्या भाषणांमधून विचारांची धार आणि अभिव्यक्तीची ताकद प्रत्ययास आली. विद्यार्थ्यांच्या सहभागाने रंगलेल्या या स्पर्धेने खेडूत शिक्षण मंडळाच्या शिक्षणपरंपरेला नवी दिशा मिळाली आहे. संवादकलेचा व आत्मविश्वासाचा पाया भक्कम करणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये “मीही बोलू शकतो, मीही विचार मांडू शकतो” असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. संजय साबळे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर पर्यवेक्षक टी. एस. चांदेकर यांनी आभारप्रदर्शन करून समारोप केला.



Post a Comment
0 Comments