दौलत साखर कारखाना शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहणार — आमदार शिवाजी पाटील
अथर्व दौलत साखर कारखान्याच्या कामगार व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत हलकर्णी येथे सर्वपक्षीय बैठक.
चंदगड (प्रतिनिधी):“दौलत साखर कारखाना हा चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा अर्थवाहिनी आहे. हा कारखाना शेतकरी आणि कामगारांच्या घामातून उभा राहिला आहे. त्यामुळे दौलत हा शेतकरी आणि कामगारांच्याच मालकीचा राहणार, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे,” असे प्रतिपादन चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी केले.
हलकर्णी येथे आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. कारखान्यातील कामगारांच्या समस्या आणि कारखाना चालकांशी सुरू असलेल्या वादाबाबत तोडगा काढण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.
आमदार शिवाजी पाटील पुढे म्हणाले, “कारखाना चालकांनी कामगारांच्या भावनांचा आदर करावा. शेतकऱ्यांना चांगला दर आणि कामगारांना योग्य वेतन, वेतनवाढ व बोनस मिळायला हवा. दौलतमध्ये बाहेरील नव्हे तर स्थानिक भुमिपुत्रांनाच रोजगाराची संधी मिळाली पाहिजे. कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी किंवा कामगारांवर आरेरावी, दमदाटी सहन केली जाणार नाही. दौलत हे चंदगडचे वैभव आहे आणि ते टिकवण्यासाठी सर्व पक्षांनी राजकीय मतभेद विसरून एकत्र यावे.”
ते पुढे म्हणाले, “दौलत कारखान्याच्या समस्यांबाबत येत्या मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सकारात्मक तोडगा निघावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच केंद्र शासनाकडूनही कारखान्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज मिळवण्याचा पाठपुरावा सुरू आहे.”
बैठकीत माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, “दौलत कारखान्यात सध्या सुरू असलेला मनमानी कारभार थांबवणे गरजेचे आहे. तेव्हाच स्थानिक शेतकऱ्यांना आणि कामगारांना न्याय मिळेल. या लढ्यात आम्ही आ. शिवाजी पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत.”
या वेळी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार राजेश पाटील, गोपाळराव पाटील, मल्लिकार्जून मुगेरी, माजी पं.स.सभापती शांताराम पाटील, बबनराव देसाई, गोकुळचे माजी संचालक दिपक पाटील, संजय गांधी निराधार समिती तालुकाध्यक्ष लक्ष्मण गावडे, नामदेव पाटील, रविंद्र बांदिवडेकर, भरमूआण्णा गावडा, दिग्विजय देसाई, तानाजी गडकरी, अशोक जाधव, संजय पाटील, शंकर मनवाडकर, गोविंद पाटील, सुरेश हरेर, अशोक कदम, चंद्रशेखर गावडे, रवि नाईक, पांडुरंग बेनके, चंद्रकांत किरमटे, अशोक गडदे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने दौलतप्रेमाची आणि एकजुटीची प्रचिती बैठकीत दिसून आली.


Post a Comment
0 Comments