शिक्षण, साहित्य आणि संस्कारांचा संगम : कवी शिक्षक संजय साबळे सरांना वाढदिवसानिमित्त सदिच्छांचा वर्षाव
![]() |
| संजय साबळे यांना शुभेच्छा देताना गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील , मुख्याध्यापक आर.पी.पाटील व सीमाकवी रवींद्र पाटील |
चंदगड :न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथील उपक्रमशील शिक्षक, कवी व साहित्यप्रेमी संजय साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत सदिच्छा भेट देत त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, “शैक्षणिक कार्याबरोबरच कला आणि साहित्य क्षेत्रात रमणारा हा अवलिया शिक्षक आहे. आपल्या काव्य आणि साहित्य लेखनातून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घालावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
न्यू इंग्लिश स्कूल, चंदगडचे मुख्याध्यापक आर. पी. पाटील म्हणाले, “साबळे सर हे अत्यंत उपक्रमशील शिक्षक आहेत. त्यांच्या विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे आमच्या शाळेचा नावलौकिक वाढला आहे. ते आमच्या शाळेचे खरे भूषण आहेत.”
यावेळी सीमाकवी रवींद्र पाटील यांनी साबळे सरांना सदिच्छा भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “साबळे सर हे शिक्षण, साहित्य, कला आणि संस्कार यांचा सुंदर संगम असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करताना ते काव्य, लेखन, निवेदन आणि सामाजिक कार्यातून समाजालाही प्रेरणा देतात. अशा संवेदनशील कवीमनाच्या शिक्षकामुळे शिक्षण क्षेत्र समृद्ध होत आहे.”
यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी साबळे सरांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी साहित्यिक आणि शैक्षणिक कार्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या.

Post a Comment
0 Comments